Sunday, 16 December 2012

Save Girls Child


निसर्गाने मानवाची निर्मिती करतांना स्त्री आणि पुरूष निर्माण केले आणि गेल्या दोन ते तीन दशकांपर्यंत त्यांच्यातील गुणोत्तरही समान ठेवले. निसर्ग सर्वांचा समतोल साधू शकतो परंतु आपल्या स्वार्थासाठी आपण त्यामध्ये ढवळाढवळ सुरू केली. मुलगाच हवा ह्य
ा मोहापायी आपण मुली नाहीशा करू लागलो. ह्यालाच प्रचलित शब्द स्त्रीभ्रूणहत्या असा आहे.
बाळंतपण ही स्त्रीच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना पूर्वी तर पुर्नजन्मच मानला जायचा. विज्ञानात प्रगती झाली आणि नवीन उपचार, साधने, औषधे निघाली. बाळंतपण त्यामानाने सोपे झाले. बाळाची स्थिती कशी आहे ते समजू लागले. परंतु त्याचवेळी बाळाचे लिंग त्या तपासणीमध्ये कळू लागले आणि एक नवीनच उपक्रम सुरू झाला.
बाळाची स्थिती समजण्यासाठी वापरण्यात येणारी सोनोग्राफीची यंत्रे प्रथम शहरांमध्ये उपलब्ध झाली. तपासणीची फी पण मोठी असल्याने शहरी आणि बर्‍यापैकी सांपत्तीक स्थिती असणारे सुशिक्षित लोक या यंत्रांचा बाळाच्या आरोग्याबरोबरच त्याची लिंग तपासणीसाठी वापर करू लागले. मुलीचा जन्म नकोच अशी बर्‍याच पालकांची इच्छा असल्याने जन्माला येणा-या बाळाचे लिंग जाणून घेऊन आपल्याला हवे असलेले मूल जन्माला घालण्याची वृत्ती वाढली.
ह्या सार्‍याचे कारण एकच की आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये मुलाच्या जन्माला फार महत्व दिले आहे. मुलगा वंश पुढे चालवितो, मुलगा म्हातारपणी आपली काठी बनून रहातो. मुलगा आधार आहे आणि मृत्यूनंतर मुलाने अत्यंसंस्कार केल्यास मोक्ष मिळतो. (इ. गोष्टी लोकांच्या मनावर ठसल्या आहेत) तर मुलीला हुंडा द्यावा लागतो, सासरी गेल्यावर मुलीचा छळ होतो, अनेक संकटांना तिला सामोरे जावे लागते, अगोदर शिक्षणावर व नंतर लग्नावर खर्च करावा लागतो आणि शेवटी ती दुसर्‍याच्या घरीच जाणार आहे मग तिच्या शिक्षणावर खर्च का करावा इ. गोष्टी लोकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
त्यानंतर मुलामुलीतला भेद, मुलगीच नको, तिला नाहीसे करण्याच्या अनेक पध्दती पाठोपाठ आल्याच. ह्या सर्व गोष्टींवर उपाय शोधणे आवश्यक आहे. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या हजारात जवळपास १३० ने कमी झाली आहे. येत्या जनगणनेत ती अजूनही कमी होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरातचा काही भाग यामध्ये निघृणपणे मुली मारल्या जात आहेत. पैसे देऊन मुली दुसर्‍या राज्यातून आणून मुलांची लग्ने लावून दिली जात आहे. मुलींवरील अत्याचाराच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वात सुरक्षित महाराष्ट्रातही कोणत्याही वयाच्या असोत स्त्रिया असुरक्षित आहेत.
प्रथमत: मुलगा आणि मुलगी हा सामाजिक भेद दूर व्हायला हवा. संधी मिळाल्यास मुली मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत किंवा काकंणभर पुढेच आहे हे मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाने सिध्द केले आहे. मुलगी असो अथवा मुलगा त्या अपत्याला त्याच्या कुवतीनुसार शिक्षण मार्गदर्शन देऊन स्वत:च्या पायावर उभे करणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. मुलाच्या लग्नात मुलीच्या पालकांकडून हुंडा, भेट वस्तू इ. घेणे ह्या प्रथा मुलाच्या पालकांनी मोडायला सुरवात करायला हवी. येणारी मुलगी ही आपली जबाबदारी असून घरातील एक व्यक्ति म्हणून सर्व हक्क व अधिकार तिला देणे आवश्यक आहे. संपत्तीत मुलीचा वाटाही समान असावा ह्या सर्व बाबी कायद्याने संमत असल्या तरी त्यांची सामाजिक अंमलबजावणी सर्व स्तरावर त्वरित सुरू व्हावी. यासाठी समाजसेवकांनी, समुपदेशकांनी प्रयत्न करावेत. नववी, दहावीच्या वर्गांपासून ह्या सामाजिक विषयाचे मुलगा मुलगी समान, दोघांचे हक्क व त्यांची कर्तव्ये सारखी आहेत, हुंडा घेणे चुक आहे, ह्या बाबींचे प्रशिक्षण त्यांना देऊन त्या त्यांच्या मनावर ठसतील असे शिक्षण संस्थांनी बघावे.
आम्हाला पहिली मुलगी आहे तेव्हा दुसरा मुलगाच हवा किंवा पहिले अपत्य मुलगाच हवे व लिंगनिदान करून आम्ही लोकसंख्या न वाढायला मदत करीत आहोत असा काही जणांचा दावा आहे. त्यासाठी पुढे गेलेल्या विज्ञानाच्या मदतीने गर्भधारणेपूर्वीच हव्या त्या लिंगाच्या रंगसूत्रांची स्थापना केली जाते. परंतु ह्या सर्व घटना निसर्ग नियमांच्या विरूध्द आहेत, हे कोणी लक्षात घेत नाही. जेव्हा मुलींची समाजातील प्रतिष्ठा व महत्व वाढेल तेव्हाच मुलगाच हवा ही वृत्ती बंद होईल. मुलींची संख्या कमी झाली की त्यांचे महत्व वाढेल ही अगदीच चूकीची समजूत आहे.

याबाबत सर्व स्तरावर प्रयत्न करतांना सुजाण नागरिकांनी, मंडळांनी कमिट्या तयार कराव्यात. मुलगी गर्भाचा गर्भपात करणार्‍या संस्थांचे, डॉक्टरांचे गुन्हे उघडकीला आणावेत. कायदा समजून घेऊन कायद्यातील तरतूदींची माहिती करून घ्यावी. त्याबाबतची जाणिव, जागृती निर्माण करावी. सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत कोणीहि असोत त्यांना मुलींच्या घटणार्‍या संख्येंचे दुष्परिणाम समजावून सांगायला हवेत. एखादे मिशन हातात घेतल्यासारखा सतत हा विषय चर्चेत यायला हवा. चांगल्या पध्दतीने समजावल्यास मुलामुलीतली तफावत कमी व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी अभ्यास करून त्यावर यशस्वीपणे बदल घडविला आहे. उर्वरित ठिकाणी असेच प्रयत्न व्हायला हवेत यासाठी समविचारी लोकांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.


No comments:

Post a Comment