पितृ देवो भव
मुलांना धाक वाटणारे ‘वडील’ गायब होऊन, मुलांना मित्र वाटावा असा बाबा गेल्या दहा वर्षांत बघायला मिळत आहे. ‘अहो बाबा’ ऐवजी ‘ए बाबा’ म्हणणारी पिढीही आता मोठी होऊ लागली आहे. आई-वडील हे जवळचे मित्र-मैत्रीण वाटावे, असे दिवस आले आहेत. आई-वडिलांचे आभार मानण्यासाठी त्यांचे असे खास दिवस साजरे करण्याचं लोण आता आपल्याकडेही आलं आहे. विरोधासाठी विरोध करणारे याला फॅड म्हणतीलही, पण आपल्या आई-वडिलांचे ‘आभार’ मानायला एक दिवस मिळतो, हेदेखील आहेच ना! अशा दिवसांच्या निमित्तानं खास काही करता येतं. त्यामुळे ते दिवस, ते क्षण केवळ त्यांचे म्हणून साजरे करता येतात.
तब्बल बावन्न देशांमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. १९१० मध्ये पहिला फादर्स डे साजरा केला गेला. आपल्याकडे मात्र फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांचे आभार मानायची पद्धत सुरू होऊन एक तपही उलटलेलं नाहीये.
परवाच अनेक र्वष एकमेकांशी न बोललेले, भेटलेले मुलगी आणि वडील यांच्या हृद्य भेटीबद्दल वाचलं आणि मन भरून आलं. वीसहून अधिक र्वष मुलीचं आणि वडिलांचं काही भेटणंच झालं नव्हतं. आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर मुलगी आईकडेच राहात होती. कोणालाही न कळवता आई-मुलगी दुसरीकडे राहायला निघून गेले. वडिलांना मुलगी कुठे आहे याचा पत्ताच आईने लागू दिला नाही. दरम्यान वडील मुलीला शोधत होते. वडील आपल्याला का भेटायला येत नाहीत, याचा विचार करून मुलगी मनात कुढत होती. त्यातच तिला कॅन्सर झाल्याचं कळलं आणि ती पार कोलमडून गेली. तिची आईदेखील वारली होती. वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या मुलीने महत्प्रयासानं वडिलांना शोधून काढलं. शेवटी वडिलांचा पत्ता लागला आणि भेटल्यावर तिनं वडिलांना प्रश्न विचारला की, तुम्ही मला भेटलात का नाही? वडील म्हणाले, ‘मी तुला खूप शोधलं, पण मला तुझा काहीच पत्ता लागला नाही.’ ते वडील आता केमोथेरपीच्या वेळी तिची सोबत करतात. तिला धीर देतात. पितृछायेत तिला वेदनांचाही विसर पडला आहे. तिचा नवरा तिला, मुलं व तिच्या वडिलांना जपत आयुष्याचे गहिरे रंग अनुभवत आहे.
ही एकच नाही तर मुलं आणि वडील यांच्या अनोख्या नात्याच्या कितीतरी गोष्टी आपण आजूबाजूला पहातो. भारतात अशा ‘डेज’ची टिंगल होते याचे अजून एक कारण आहे. आशियाई देशांत विशेषत: भारतात आपण तसे कुटुंबापासून तुटलेले नसतो. लग्न झाल्यानंतर एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाण्याची वेळ (म्हणजे आई-वडिलांपासून दूर जाण्याची वेळ) फक्त मुलींवरच येते. तसेच आई-वडील सतत मुलांच्या संपर्कात असतात. सकाळी उठलं की मातृ-पितृदर्शन होतंच. मुद्दा असा की, ऊठसूट प्रेम व्यक्त करण्याची आपली पद्धत नाही. आणि मुलानं आई-वडिलांचे काय आभार मानायचे, अशीच आपली भावना असते; परंतु आपली संस्कृतीही सांगते - ‘मातृ देवो भव आणि पितृ देवो भव.’
इथे आणखी एक घटना सांगाविशी वाटते- सदतीस वर्षांचा तरुण.. खूप खूप बीझी.. पुढे जायची धडपड, त्याचा असह्य ताण.. लग्नं झालं, दोन मुली झाल्या. मग आपल्याला मिळालं नाही ते सर्व मुलींना मिळावं म्हणून अजून काम.. अजून स्पर्धा.. कोणाशी बोलणं नाही, गप्पा नाहीत. मित्र-मैत्रिणी कमी झालेले, बायकोशी मुलींचा विषय सोडून काय बोलायचं ते कळू नये इतका संवाद खुंटलेला.. एक दिवस त्याला ब्रेन हॅमरेज होऊन इमर्जन्सी रूममध्ये हलवावं लागलं. तो वाचला. त्यानं त्या दिवसाच्या आठवणी सांगताना म्हटलं- ‘डोक्यात काहीतरी खूप मोठ्ठं फुटत आहे, तसं वाटत होतं. नजरेसमोर अंधार होता; तेव्हा माझ्या मनाला करिअर, काम, पगार, पैसा यातल्या कशाचाही विचार शिवला नाही. माझ्या मुली, बायको आणि माझे हरवलेले मित्र-मैत्रिणी डोळ्यांसमोर आले. जे महत्त्वाचं नव्हतं त्या कशाचीच आठवण झाली नाही. आयुष्यभर मी जे महत्त्वाचं आहे त्यापासून पळत राहिलो. आता लक्षात येतंय की, माझ्यावर प्रेम करणारे माझ्यासोबत असणार होते. या आजारानं मला कोणचं किती आणि काय महत्त्व आहे, हे दाखवून दिलं.’ या माणसाची गोष्ट दोन महिन्यांपूर्वी मी टीव्हीवर पाहिली; परंतु आजही त्याचा प्रत्येक शब्द मला अजून जसाच्या तसा आठवतो आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते ती महत्त्वाच्या गोष्टी ठरवायची.. त्यांना त्यांचं देणं द्यायची.. ते केवळ कोणत्या तरी ओझ्यातून मुक्त व्हावं किंवा हिशेब चुकता करावा म्हणून नाही, तर नात्याचं आणि पर्यायानं आयुष्याचं आपल्यालाच ओझं होऊ नये म्हणून.. म्हणूनच फादर्स डे साजरा करावा की नाही या वादात पडण्यापेक्षा वडिलांना घेऊन एखादा सिनेमा बघणं, त्यांच्याशी एखादा खेळणं, त्यांना जेवायला घेऊन जाणं, त्यांच्या पसंतीची जुनी गाणी ऐकणं, त्यांना एखाद्या नाटकाला घेऊन जाणं, त्यांना हवं असलेलं एखादं पुस्तक देणं, त्यांच्या आवडीची गोष्ट देणं आणि आपल्याला ते अजूनही हवे आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून देणं, यात खासा आनंद आहे.
अमेरिकेमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करतात. आपल्या वडिलांचे आभार मानायला हा दिवस असतोच, पण अमेरिकेत पित्यासमान व्यक्ती, आजोबा, पणजोबा यांचीही आठवण काढली जाते. सोनोरा स्मार्ट डॉड ही महिला १९०९ मध्ये मदर्स डेच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना वडिलांसाठीही असाच सोहळा झाला पाहिजे, असं तिच्या मनानं घेतलं. तिच्या वडिलांनी विल्यम स्मार्ट यांनी पत्नीच्या निधनानंतर तिच्यासह पाच भावंडांना मोठय़ा प्रेमानं मोठं केलं होतं. सोनोराच्या या कल्पनेला अमेरिकेत सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटी १९७२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डेला सरकारी मान्यता दिली. खास वडिलांसाठी विविध भेटकरड, वस्तूंनी अमेरिकेतली बाजारपेठ सजते. आता केवळ अमेरिकेतच नव्हे, तर तब्बल बावन्न देशांमध्ये वडिलांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा हा सोहळा साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment