Friday 28 September 2012

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?


खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

उद्या २९ सप्टेंबर २०१२ रोजी खैरलांजी हत्याकांडाला ६ वर्षे पूर्ण होतील, आणि कधीही बऱ्या न होणाऱ्या आमच्या काळजाच्या जखमा पुन्हा रक्ताळ्तील, उद्या या घटनेविरुद्ध कुठे शोक सभा होतील, कुठे श्रद्धांजली वाह
िली जाईल, कुठे निदर्शने केली जातील, एकाद्या न्यूज च्यानेल वर विषय घेतला जाईल आणि काही निकाल लागण्यापूर्वीच आमची वेळ संपली म्हणून विषय बंद हि केला जाईल, पण या सर्व गोष्टीतून आम्हाला मात्र तीव्र वेदना जरूर होतील, आमच्या आया, बहिणी, बांधव, या बेगडी पुरोगामी महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का ? आज हि कित्येक गावात सर्रासपणे रोज खैरलांजी घडत आहे, कित्येत भोतमांगे आज वेगवेगळ्या नावाने या जातीयतेचे बळी पडत आहेत. आज पुन्हा एकदा "Atrocities Act" आणि सरकारच्या जातीयता निर्मूलनाच्या हेतूवर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे, या निमित्ताने जाणून घेऊ खैरलांजी प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम.... तत्पूर्वी अमानुष जातीय हत्याकांडात बळी पडलेल्या भोतमांगे कुटुंबातील सुरेखा, प्रियंका, सुधीर आणि रोशन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.....!

महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून टाकणारे खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ ला घडले. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली.घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.

हत्याकांडाची पार्श्वभूमी आपण थोड्यात अश्या प्रकारे होती, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंब स्वाभिमानाने जगात होते, छोट्याश्या शेतीच्या तुकड्यामध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते, रोशन हा डोळ्याने अंध होता, प्रियांका शाळा शिकत होती, टापटीप आणि सुशिक्षित महाराची पोर जाता येता गावातल्या जात्यंध डोळ्यांना सलत होती, भोतमांगेच्या शेतामधून गावकऱ्यांसाठी रस्ता देण्यावरून अधून मधून खुसपूस होतच होती.

धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये भोतमांगे कुटुंबियांच्या ओळखीचा होता, त्याचे भोतमांगे कुटुंबियांकडे अधून मधून येणे जाणे होते, दुसऱ्या गावातील पोलीस पाटील या महारांच्या घरी येतोय, गावगुंड कसे आणि किती सहन करणार, त्यामुळे भोतमांगे कुटुंबीय गावगुंडाच्या नजरेत जास्तच सलत होते, गावातील अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारणा त्यागून भोतमांगे कुटुंबीय बाबासाहेबांच्या विचारावर चालत होते, सावित्रीची लेक बनून शिक्षणाचा ध्यास घेत होते, हेच गावगुंडांच्या विखारी नजरेस खुपत होते.... भोतमांगे कुटुंबाविरुद्ध आपला राग व्यक्त करण्यास फक्त एक कारण हवे होते आणि ते कारण एके दिवशी घडलेच....!

खैरलांजी गावचा सकरू बिंजेवार हा धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये याच्या शेतामध्ये काम करीत असे. त्याच्या मजुरीचे २५० रुपये सिद्धार्थने न दिल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यात सकरूला मारहाण करण्यात आली. त्याचा बदला घेण्यासाठी ३ सप्टेंबरला सकरूचा मुलगा गोपाल, शिवचरण मंडलेकर, कन्हैया मंडलेकर आणि जगदीश मंडलेकर यांनी सिद्धार्थ गजभियेचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. सिद्धार्थच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी १६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली. हा गुन्हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न होता नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार दाखल झाला होता.

"तुम्ही जामिनावर सुटले असला तरी सिद्धार्थ गजभियेची माणसे शस्त्रे घेऊन तुमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा सावध राहा", असे दिलीप ढेंगे याने भास्कर कढव याला मोबाईलवर सांगितले. हे ऐकून चिडलेल्या आरोपींनी सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ राजन यांचा शोध घेतला परंतु, ते दोघे सापडले नाहीत. त्यामुळे बदला घेण्यासाठी हे आरोपी भोतमांगे यांच्या घरी गेले.

सिद्धार्थ गजभियेच्या बाजूने साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून काठय़ा आणि सायकलच्या चेनने मारहाण करून हत्या केली. महिलांचा विनयभंग करून त्यांचे निर्वस्त्र मृतदेह बैलगाडीत टाकून साडेतीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात फेकून देण्यात आले. ही घटना घडताना या अमानुष हल्ल्यात एकमेव व्यक्ती वाचली भैयालाल भोतमांगे. भैय्यालाल वाचल्यामुळे सदर हत्याकांड उघडकीस आले, अन्यथा दररोज अश्या प्रकरच्या घडणाऱ्या घटनांचा सुगावा देखील लागत नाही, कारण प्रत्येक वेळी भैयालाल वाचत नाही.


या घटनेबाबत कळूनही सिद्धार्थने या कुटुंबाला काही मदत केली नाही. घटनेपूर्वी सुरेखाने तिचा भाचा राष्ट्रपाल नारनवरे याला फोन करून, आपण साक्ष दिलेली असल्याने काही घडू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. आपला आंधळगाव पोलिसांवर विश्वास नसल्याचेही तिने सांगितले. त्यावर, तू वरठीला येऊन जा, असे राष्ट्रपालने तिला सांगितले होते. मात्र, सुरेखा तिकडे गेली नाही आणि हल्ल्याला बळी पडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे प्रेत वडगाव शिवारात सापडले.’ तिसऱ्या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सुरेखा, रोशन व सुधीर यांचे मृतदेह कालव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. पोलिसांनी याप्रकरणी आधी २८ जणांना अटक केली. नंतर इतरांच्या अटकेमुळे ही संख्या ४४ वर गेली. आरोपींकडून १२ काठय़ा आणि सायकलच्या ८ चेन जप्त करण्यात आल्या.

पोलिसांनी या प्रकरणी १ ऑक्टोबर २००६ ला गुन्हा दाखल करून २७ डिसेंबरला भंडारा येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सी.बी.आय. ने या प्रकरणी ४७ जणांना आरोपी केले होते परंतु, त्यापैकी ३६ जणांची न्यायालयाने सुटका केली. शेवटी ११ आरोपींवर खटला चालला. ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण ३६ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यापैकी महादेव झंझाळ हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाला. त्यासाठी याला ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

भंडाऱ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी या प्रकरणाची सुनावणी करून १५ सप्टेंबर २००८ ला निकाल जाहीर केला. खून, पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीररीत्या मंडळी जमवणे व दंगा करणे, या आरोपांखाली त्यांनी आठ आरोपींना दोषी ठरवले. दोघांची पुराव्याअभावी तर, एकाला संशयाचा फायदा देऊन अशा तीन आरोपींची न्यायालयाने सुटका केली होती. या हत्याकांड प्रकरणी सुरवातीला ४७ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र, त्यांतील ३६ जणांची "सीबीआय'ने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर उरलेल्या अकरा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या हत्याकांड खटल्याचा निकाल भंडारा येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. दास यांनी २४ सप्टेंबर २००९ रोजी दिलेला आहे.

त्यातील आरोपींच्या शिक्षेला आव्हान देण्यात आले होते. सरकारच्यावतीने आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी आणि आरोपींविरोधात अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला मान्य करण्यात यावा म्हणून केंदीय गुप्तचर खात्याच्यावतीने दोन अर्ज करण्यात आले होते. त्यावर न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. आर. सी. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. तेव्हा ऍड. खान यांनी आज प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी न्यायालयासमोर सादर केली.

भोतमांगे कुटुंबीयांच्या हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार म्हणून भोतमांगे यांचा शेजारी मुकेश पुसाम याला सरकारी पक्षाने सादर केले होते. घटनेच्या वेळी पुसाम हा घरात होता. तेव्हा त्याला जगदीश मंडलेकर याचा जोराने शिवीगाळीचा आवाज आला. त्यामुळे पुसाम घराबाहेर येऊन उभा राहिला. तेव्हा जगदीश मंडलेकर याने शिवीगाळ करून भोतमांगे कुटुंबीयांना जीवे मारण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करताना पाहिले. जमावाचा आवाज ऐकून सुरेखा भोतमांगे घराबाहेर आली होती. तिने गोठ्याला आग लावली तसेच नंतर जमावाने तिला पकडून लाठ्या आणि सायकलचेनने मारताना पुसामने बघितले होते. पुसामने त्या सातही आरोपींची नावे न्यायालयात साक्षीतून दिलेली होती. तसेच त्याने दिलेली नावे ही न्यायदंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बयाणातही आहेत. त्यामुळे त्याची साक्ष ही प्रमुख मानली गेली. पुसामच्या साक्षीनुसार, आरोपींनी प्रथम सुरेखाला नालीत टाकून लाथा, काठी आणि सायकलचेनने मारले. नंतर तिचा मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. नंतर त्यांनी सुधीरला घेरून मारले आणि त्याचा मृतदेहही तिच्या शेजारी आणून ठेवला. त्यानंतर रामदास खंडातेच्या गोठ्यात लपून बसलेल्या रोशनला मारून तिथे आणले. तर प्रियांकालाही अशाप्रकारे मारून तिथे आणल्याचे पुसामने साक्षीत नमूद केले आहे. दरम्यान, रोशन हा त्यावेळी जिवंत होता. त्याने आपला जीव वाचविण्यासाठी आरोपींना याचना केली होती; मात्र भोतमांगे यांना मारल्याची बाब कुणाला सांगितली तर अशीच दशा केली जाईल; म्हणून जगदीश मंडलेकरने धमकावले होते. त्यामुळे घाबरून पुसाम आपल्या घरात गेला. तेथून त्याने आरोपींना भोतमांगे कुटुंबातील चौघांना बैलगाडीतून नेताना बघितले होते. त्यावेळी कोण बैलगाडी हाकत होता; तसेच त्यामागे कोण जात होते, त्यांची नावेदेखील पुसामने साक्षीतून दिलेली आहेत.

या प्रकरणात पोलिसांनंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला होता. मुख्य घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नाही, सुरेखा भोतमांगे हिचे शव कोठे सापडले याचा पंचनामा केलेला नसणे, घटनास्थळाचे वर्णन दोषपूर्ण आहे, असेही बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले. मुकेश पुसाम घटनेच्या दिवशी गावात नव्हता, असा युक्तिवादही करण्यात आला. ज्या बैलगाडीतून प्रेत नेण्यात आले त्याच्या मालकाचा जाब नोंदवण्यात आलेला नाही. शिवाय, हत्याकांडात वापरण्यात आलेली हत्यारे न्यायालयात दाखवण्यात आलेली नाही, असेही बचाव पक्षाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.

फाशीची शिक्षा सुनावण्यात झालेल्या ६ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेप ऐकवली. अन्य दोघांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. हायकोर्टाच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिगने हा निकाल जाहीर करताना न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. रवींद चव्हाण यांनी सकरू बिंजेवार, शत्रुघन् धांडे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर, विश्वनाथ धांडे, रामू धांडे यांची शिक्षा कमी केली. तर गोपाल बिंजेवार आणि शिशूपाल धांडे यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्का बसवला.

खैरलांजी हत्याकांड जातीयवादातून घडले आहे. त्यामुळे सर्व आरोपींना ऍट्रॉसिटीअंतर्गत शिक्षा करण्यात यावी, असा अर्ज सीबीआयने दाखल केला होता. 29 सप्टेंबर 2006 रोजी संध्याकाळी गावकऱ्यांनी अचानक भैय्यालाल भोतमांगे यांच्या घरावर हल्ला केला होता. तेव्हा आरोपींनी जातीयवाचक शिविगाळ करुन घरातील एकेका सदस्याला पकडून ठार मारले होते. भैय्यालाल भोतमांगे यांनी केलेल्या तक्रारीत आरोपींच्या जातीचा उल्लेख केला असला तरीही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांमध्ये आरोपींच्या जातीचा उल्लेख तक्रारीत असणे अनिवार्य नसल्याचे नमूद केले आहे. खटल्यादरम्यान एका साक्षदाराच्या साक्षीत पाच आरोपी हे कलार जातीचे असल्याचा उल्लेख आलेला आहे. सदर बाब सत्र न्यायालयाने ग÷ाह्य धरली होती.तरीही सर्व आरोपींची ऍटॉसिटीअंतर्गत निर्दोष मुक्तता करुन सत्र न्यायालयाने ज्युडिशिअल एरर (न्यायीक चूक) केंली असल्याचा युक्तीवाद सीबीआयचे वकील एजाज खान यांनी उच्च न्यायालयात केला होता. तसेच सर्व आरोपींना ऍट्रॉसिटी अंतर्गत शिक्षा करावी, अशी विनंती सीबीआयने केली होती. तर बचाव पक्षाने गावात जातीयवाद नसल्याचा दावा केला होता. तर सत्र न्यायालयाने ऍट्रॉसिटीतून मुक्त करण्याच्या निर्णयाचा आदर बचाव पक्षाने व्यक्त केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत सत्र न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. आरोपींना प्रियंका व सुरेखा यांच्या विनयभंगाच्या आरोपातून मुक्त करुन सत्र न्यायालयाने गुन्ह्याची तीव÷ता कमी केली, असा युक्तीवाद करीत सीबीआयने या गुन्ह्याखालीही सर्व आरोपींना शिक्षा करावी, असा अर्ज केला होता. मात्र, सीबीआयचा हा अर्ज देखील न्यायालयाने निकालात काढला आहे.

हत्याकांडातील सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावली, १४ जुलै रोजी देण्यात आलेल्या या निकालाला सीबीआय लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार होती . हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला भैय्यालाल भोतमांगे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती करणारी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेला जगदीश मंडलेकर 13 फेब्रुवारी 2012 ला पॅरोलवर एका महिन्यासाठी गावी खैरलांजी येथे आला. दरम्यान, दम्याचा त्रास वाढल्याने त्याच्या पॅरोलचा कालावधी एका महिन्याने वाढविण्यात आला. तो 13 एप्रिलला कारागृहात परत जाणार होता. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जर असेच एक एक आरोपी स्वत होऊन मरण पावू लागले तर न्यायचे काय ? आम्हाला न्याय कसा मिळणार जेव्हा या हरामखोर लोकांना फाशीवर लटकावले जाणार नाही तो पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, सदर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा दिली तरच कुठे यांचे जात्यंध हात पुन्हा असे कृतं करायला धजवणार नाहीत, सदर प्रकरणात मा.न्यायालयाने हा जातीवादाचा मुद्दा फेटाळून लावला याला जबाबदार सदर इच्छाशक्तीचा अभाव असलेले पोलीस खाते आणि सी.बी.आय. नावाचे कृत्रिम खेळणेच होय. राज्य शासन उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच आरोपींची फाशीची शिक्षा रद्द होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेलेली आहे. पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती कायदा सक्षम करण्याची आणि जातीयता गाडण्यासाठी कार्यक्षम कार्यप्रणालीची उणीव भासते...!

माननीय न्यायालयाने इतर हत्याकांडाच्या प्रकरणा सारखेच न्यायदानाच्या गोंडस नावाने निकाल तर दिला, परंतु जातीवादाच्या बळी पडलेल्या खैरलांजी हत्याकांडातील निरपराधाना खरोखर न्याय मिळाला का ?


संदर्भ - विविध ई न्यूज पेपर आणि न्यायालयाचे निवाडे....!


Tuesday 18 September 2012

गोलपिठा व ढसाळ यांविषयी:विजय तेंडूलकर



‘गोलपिठा’ या नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. हा काव्यसंग्रह मराठी साहित्यातला खर्‍या अर्थाने ठरलेला माईलस्टोन आहे. एकुण साहित्य जगतातील सारस्वतीय नियमांना सुरूंग लावण्याचे काम या काव्यसंग्रहाने केले. एकदा वाचाच .. आपसुक तोंडातून लव यू ढसाळ आल्याशिवाय राहत नाही.
नामदेव ढसाळ त्याच्या कवितासंग्रहाची बातमी सांगत आला तेंव्हा मला आनंद वाटला. कवितांचा मी व्यासंगी वाचक नाही. परंतु कविता समोर आली तर घाईने उलटतही नाही. ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काहीवेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या. तरीही त्यामागचे मन जाणवले होते. नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, ते तेंव्हा कळले. इतके प्रश्न मनात जमले की काही विचारणेच जमले नाही. ढसाळ थोडासा हसला, मी थोडासा हसलो. ढसाळचे हसणे मला जवळिकीचे वाटले नाही. असेही वाटले की ते जवळिकीचे का असावे? त्याच्या मनात माझ्या जगाविषयी एक आकसच असला पाहिजे. त्याच्या लेखी मी त्या जगाचा प्रतिनिधीच नव्हतो काय?
नंतर काहीवेळा तो दिसत असे, पण हा माणूस आपल्याशी नीट बोलणार नाही असे माझ्या मनाने घेतले होते. ढसाळची कविताच त्याच्यापेक्षा मला जवळची होती. तिच्यातले अनेक शब्द, प्रतिमा न कळूनही ती मला अस्सल, कसदार आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. या कवितेशीच माझी प्रसंगाप्रसंगाने एका मर्यादेपर्यंत दोस्ती जमलेली होती. आणि ढसाळ एकदा माझ्याशी आपण होऊन बोलला.मला खूप बरे वाटले.
या आश्चर्याला नंतर फार वाव उरलाच नाही. ढसाळ माझ्याकडे येऊ लागला, बसू लागला, हसू-बोलू लागला. इतके खोलवर वेदनेने आणि रागाने भरलेले काव्य लिहिणारा हा तरुण इतका प्रसन्न हसतो कसा, याचे मी नवल करी. असाच तो आला आणि हसत म्हणाला, ‘माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.’ त्याने फार प्रयत्न न करताच मी होकार दिला. आता आठवते की माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी आग्रहाने सांगितले पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते. तो म्हणाला, “तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही.”
कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार? केवळ एखादी गोष्ट आपल्याला समजते तशी आणि तेवढी आवडते हा काही तिच्यावरील आपला अधिकार ठरत नाही. जसजसा विचार करू लागलो तसतसा माझा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास आणखी कमी होऊ लागला. मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहित करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला ‘सर’ म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले. एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेषानरेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच. अज्ञानी मी होतो. चंद्रबिंदी म्हणजे काय, डोबरी म्हणजे काय, सादळलेली जडे म्हणजे काय, रांडकी पुनव कशी आणि कुठे असते, खैरबांडे पांजरपोळ डग्गा याचा अर्थ काय, धेडधाय पोटले कशाला म्हणावे, न…..नष्टचर्य असे एका कवितेत किंवा उजेड असे दुस-या एका कवितेत आवर्जून त्याने का लिहिले आहे, पाणचट गवशी कुठे असते, छप्पनटिकली बहुचकपणा नक्की कसा, मगरमच पलीत्यांचा अर्थ काय, कु. अनुराधा बुधाजी उपशाम कोण आणि कोठली, थम घेऊन म्हणजे काय करून, महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपड्या यात सांडणे शब्द कशाकरता, रायरंदी हाडूक कसे असते, खोडाबेडा हात म्हणजे कडे हात, बिंदाचिंदा हा कोठला शब्द, नेपाळी पोरी डावेउजवे कसे करतात, कंट्रीच्या मसाल्याची मलभोर मलय हे काय प्रकरण, पिंढ म्हणजे शरीराचा कोठला भाग, डिंगडांग धतींगचा शब्दार्थ काय, गुपची शिगा, डेडाळे, डल्ली,सल्ली, बोटी, गुडसे, डिलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात,- एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपने आणि अधिकाराने समजावले. समजावताना एकीकडे तो संकोचत होता(विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेह-यावर दिसत होता.
परंतु अर्थ विचारताना आणखीनच घोटाळा होऊ लागला. ढसाळच्या जगाविषयीच्या माझ्या घोर अज्ञानाने मला आता पुरते घेरले. कित्येक गोष्टींचे आपणाला ज्ञान नसते. नव्हे, अज्ञानच असते. परंतु जोवर त्या गोष्टीविषयी जाहीररीत्या व ते देखील लेखी काही म्हणण्याचा सवाल येत नाही तोवर अज्ञानासकट आपण सुखात असतो. ढसाळने मला हसत हसत खिंडीतच गाठले होते. माझ्या अज्ञानाची मला (क्वचितच वाटू शकणारी) शरम वाटली. इतक्या जवळ जगणा-या या जगाविषयी आपण असे मख्ख असावे हे जाणवले आणि बोचू लागले. मी ढसाळला म्हणालो, “मला तुझे जग पाहायचे आहे.” हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो. त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
परंतु इतकेच. एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार? फार फार वर वर मी थोडेबहुत पहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवीत होते. ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती. ढसाळची कविता आजही मला पुरती समजली आहे असे मला वाटत नाही. पण ती मला जरा जास्त समजू लागली आहे आणि त्याहूनही जास्त आवडू लागली आहे. ढसाळच्या जगात उभे राहून त्याच्या कवितेत डोकावण्याचा प्रयत्न टाकून, मी आता ढसाळच्या कवितेच्या पुलावरून त्याचे जग समजावून घेऊ लागलो आहे. ह्या जगाच्या प्रत्यक्ष आणि ढसाळनेच घडवलेल्या ओझरत्या दर्शनाने या कामी मला चांगली मदत झाली आहे.
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’- निर्मनुष्य प्रदेश -जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, गोलपिठा नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते.
हे जग आहे रात्रीच्या दिवसाचेरिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचेमरणाच्या खस्तांचेउद्याच्या चिंतांचेशरम आणि संवेदना जळून उरणा-या मनुष्यादेहाचेअसोशी वाहणा-या गटारांचेगटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणा-या तरुण रोगी देहांचे,बेकारांचेभिका-यांचेखिसेकापूंचेबैराग्यांचेदादांचे आणि भडव्यांचेदर्ग्यांचे आणि क्रुसांचेकुरकुरणा-या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचेगांजाच्या खाटल्याचेत्याच खाटल्यावरल्या कोप-यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला शरीफ‘ बनवण्याची महात्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणा-या क्षयरोगी बापाचेहिजड्यांचेहातभट्ट्यांचे,अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणा-या ऊन चिकट रक्तांचेवाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचेस्मगलिंगचेनागव्या चाकूंचेअफूचे.
१९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडी येणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणी त्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वाना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गि-हाइकाच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जीवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया-क्षमा-शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो, ‘इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच-उफराट्या काळजाचा-असतो.”
हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणा-या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते. नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज.-कदाचित तसाच जगाला असता;

परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीनदीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले
घटनेने दास्यमुक्त झालेपरंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळजुलूमपिळवणूक विटंबना संपली नाही. कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखा फुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते.
भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे, मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते. हागमूत, झवणं, लवडा, लेडाची गाडगी, जंतांच्या माळा यांचे नामदेव ढसाळ याच्या कवितेतले उल्लेख उपरे राहत नाहीत. त्याच्या सर्व कवितेमधून वाहणा-या खोलवरच्या संतप्ततेचे ते काव्यात्म उद्रेक बनतात आणि म्हणून कविताच वाटतात.
अनेक अपरिचित बोली-शब्द या कवितांतून सहजपणे येतात. परिचित शब्दांचे अनोखे उपयोग होताना दिसतात. या सा-यात विलक्षण आत्मविश्वास जाणवतो. पांढरपेशा थराने दिमाखात जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो, निर्दयपणे तिची मोडतोड करतो अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचे बुद्ध्याच एक विद्रूप करतो. त्याच्या कवितेतील आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. हे करताना भाषेचे पारंपारिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजले आहे याचेही पुरावे तो मधूनच देतो. या अशा गंगाजमनी, विद्रूप, मोडक्यातोडक्या परंतु अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ त्याचे जगणे एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेते. या जगण्यातला असह्य दाह कवितारुप होतो. या जगण्यातल्या अदम्य संतापाचा उकळता लाव्हा सुस्थित , संभावित जगावर चौफेर भिरकावीत नामदेव ढसाळ याची कविता जेंव्हा ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना’ हकारित, ‘अंधारयात्रिक’ होण्याचे नाकारीत, ‘शहराशहराला आग लावण्या’ चे पुकारे देत सुसाट निघते तेंव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणा-या ख-याखु-या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. या प्रकारचे जे कवी ढसाळ याने लिहिले आहे, ते चुकूनही प्रचारकी झालेले नाही हे विशेष. हि बंडखोरी आत्म्याची आहे; कंठाळी नाही. या बंडखोरीला -कवितेपुरते तरी-राजकीय रंग नाहीत, ती अधिक मूलभूत स्वरूपाची आणि म्हणून अस्सल आहे.
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे‘, ‘पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ठ‘ , असे म्हणण्याचा छातीठोक निर्भयपणा तिच्यात आहे.गोलपिठ्याच्या गल्लीबोळांतून मशाली पेटवून हिंडणा-या महाग्यानी‘ लोकांना उद्देशून, ‘ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार काळात नाही त्यांनी पेटलेल्या माणसांना छप्पन टिकली बहुचकपणा अजूनही दाखवावा?’ असे ती न कचरता म्हणू शकते. व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावेतसाहित्यसंघशाळाकॉलेजेहॉस्पिटलेविमानअड्डे यांवर हातबॉम्बहैड्रोजनबॉम्ब टाकावेत.‘, असे घोषित करण्याइतकी ती निर्णायक आहे. तडजोडीचे सर्व पूल तिने केंव्हाच उडवले आहेत आणि प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा तिने उचलला आहे. कवी ढसाळ याच्या कवितेला निकाली झुंजीचा जसा काही ध्यास लागून राहिला आहे. या ध्यासातली तिच्यात व्यक्त होणारी क्षणिक उदासीनतादेखील मरगळलेली नाहीतो बलदंड प्रज्ञेचा क्षणिक शीण भासतो. तो पराभव नव्हेती युद्धतहकुबी असते.
या कायम युद्धमान कवितेतला शृंगार, तिच्यातला वियोग, तिच्यातील तात्कालिक वैफल्य, तिच्यातील तसलेच वैराग्य किंवा तिच्यातले गा-हाणे, या सा-याला बंडखोर गरम रक्ताचा जो स्पर्श आहे तो मला तरी फार लोभसवाणा वाटतो. समाजातील दडपून आलेल्या थरातून आलेला ढसाळ हा काही पहिलाच कवी नव्हे. तो या थरातील पहिलाच गुणी कवी देखील नाही. परंतु मराठी कवितेच्या परंपरेचा काही वारसा घेऊनही तिच्यातले अर्वाचीन पांढरपेशे मन आपल्या कवितेत सरकू न देणारा, आपल्या कवितेचा पिंड अंतर्बाह्य आपल्या जगाशी पक्का बांधला ठेवलेला आणि या प्रयत्नात कोठेही खोटा, प्रचारकी वा कंठाळी न होणारा ढसाळ हा विरळा दलित कवी मात्र नक्कीच आहे. अद्याप तरी त्याला हे जमले आहे. त्याच्या कवितेने मला अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगाची आठवण मला दिली असे मी म्हटले तर त्यात मी ढसाळची औपचारिक स्तुती करतो असे कोणी मानू नये. तुकारामाचा अध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसह ढसाळची कविता वागवताना मला भासते.
कवी ढसाळचा भविष्यकाळ कसा असेल ते मला माहित नाही. त्याच्या सामाजिक थरातून मोठा दिलासा देत पुढे आलेले लेखक, कवी पाहता पाहता चुकीच्या अर्थाने पांढरपेशे, शब्दाळ किंवा रोमँटिक झालेले मी पहिले आहेत. त्यांच्या निर्मितीने आत्माच गमावला आणि ती निष्प्रभ बनली, जुन्या कीर्तीवर मिरवत राहिली. ढसाळ याचे असे न होवो.


धम्मपदातील गाथा आणी अन्य महत्त्वाचे धम्मपद म्हणजे ज्ञानाचा महासागर.. धम्मपदातील काही महत्त्वाच्या गाथांचे मराठीत अर्थ व अन्य महत्त्वाच्या बाबी


धम्मपदातील गाथा आणी अन्य महत्त्वाचे
धम्मपद म्हणजे ज्ञानाचा महासागर.. धम्मपदातील काही महत्त्वाच्या गाथांचे मराठीत अर्थ व अन्य महत्त्वाच्या बाबी

••►जो बुद्ध, धम्म, संघाला सरण जातो, तो आपल्या प्रज्ञेने चार अरिय सत्य समजतो.

••►जगात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःख निरोध व दुःख मुक्तीचा अष्टांगिक मार्ग ग्रहन करणे कल्याणकारक आहे.

••►या सर्वांना सरण गेल्याने मनुष्य सर्व दुःखापासुन मुक्त होवु शकतो.

••
►डोक्याचे केस पांढरे झाल्याने कोणी पंडित होत नाही, थोर होत नाही. त्याचे आयुष्य वाढलेले असते. तो विनाकारण म्हातारा झाला असे आपण म्हणतो.
ज्याच्यामध्ये सत्य, धम्म, अहिंसा, सयंम, व दम आहे त्यालाच आपण पंडित म्हटले पाहिजे.

••►दुराचरण युक्त मनुष्य, दुसर्यांना भिक मागणारा मनुष्य भिक्खु होवु शकत नाही. जो पुण्यककर्म करतो, जो पापकृत्यापासुन दुर राहातो, जो ब्रम्हचरियेचे पालण करतो, ज्ञानपुर्वक विचाराने लोकांमध्ये वावरतो त्यालाच भिक्खु म्हणावे

••►ज्याचे शरीर शांत आहे, ज्याची वाणी शांत आहे. ज्याचे मन शांत आहे. जो समाधीयुक्त आहे. ज्याने सर्व तृष्णेवर मात केली त्यास भिक्खु म्हणतात.

••►भगवान बुद्धांचा जन्म सुखकारक आहे. भगवान बुद्धांचा धम्म उपदेश सुखकारक आहे. भगवान बुद्धाची संघएकता सुखकारक आहे. बुद्धाची समुह तपश्या सुखकारक आहे.

••►भिक्खुंचे स्थान महान आहे, त्यांचा मम्रतापुर्वक सन्मान केला पाहिजे, वंदामी भंते असे भिक्खुला म्हणावे. असे बौद्ध गृहस्थ, उपासक यांनी केले तर एक आदर्श बौद्ध संस्कृतीची वाढ होईल.

••►कटु शब्दामुळे ज्याला राग येत नाही, तो सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय.

••►बुद्धाने दुःखाच्या कारणांचा व दुःखाच्या मुक्तीचा शोध लावुन सर्व विकारावर विजय मिळविला. संबोधी प्राप्त केली व मानवाच्या कल्याणासाठी लोकांना शेवटपर्यंत धम्म शिकविला म्हणुन आपण बुद्धाला सरण गेले पाहिजे.

••►नैसर्गीक सत्य, नियमांशी श्रद्धा व एकनिष्ठता व्यक्त करण्यासाठी धम्माला सरण गेले पाहिजे.

••►तथागताच्या मार्गावर राहुन, निब्बाण प्राप्तीसाठी एक निष्ठेने प्रयत्न करनार्या लोकांचा तो एकमेव समुह आहे, म्हनुण आपण संघाला सरण गेले पाहिजे.

••►धम्म कार्यकरतान होणारा आनंद हा श्रेष्ठ आनंद आहे.

••►भारतीय राष्ट्रध्वजाच्या मधल्या पट्यावर धम्मचक्र रेखांकित केला आहे. 22-6-1947 ला मान्यता मिळाली. त्यावेळी पंडित नेहरुंनी म्हटले कि, धम्मचक्राचे भारताच्याच नव्हे तर संपुर्ण जगाच्या इतिहासातील सर्वात उज्वल असे नाव आहे, व तो जगाच्या स्वातंत्र्याचे प्रतिक ठरेल. महान बौद्ध सम्राट अशोकाची परंपरा पुढे चालविली पाहिजे असे मत घटना समिती सदस्यांनी व्यक्त केले.

••►राष्ट्रपतींचा जेव्हा पहिल्यांदा शपथ विधी होत होता, तेव्हा त्या प्रसंगी इतर देव देवतांच्या मुर्ती न ठेवता फक्त भगवान बुद्धाची मुर्ती ठेवण्यात आली होती.

••►धम्म हा सार्वत्रिक आहे. त्याला जाती, पंथ, धर्म याचे बंधन नाही. वेगवेगळ्या जाती व धर्माचे लोक स्वतःच्या व इतरांच्या भल्यासाठी अनुकरण करु शकतात.

••► सर्व उत्पन्न होणाऱ्या वस्तू अनित्य आहेत ,असे प्रज्ञेद्वारे ज्याला
समजते , तो दुक्खातून मुक्त होतो ; आणि हाच खरा मन शुद्धीचा खरा मार्ग आहे.

••► सर्व उत्पन्न होणारे दुक्खमय आहे, हे जेव्हा साधकाला समजते ,
तेव्हा त्याला दुःखाची घृणा येते, हाच चित्तशुद्धी मार्ग आहे.


Friday 7 September 2012

Social Capital




आजच्या घडीला भारतात सोशल मिडीया वापरकर्त्यांमध्ये माध्यमहीन वर्गाचा वरचष्मा दिसून येतो. त्यांचे शेअर्ड इंटरेस्ट जपणारे माध्यम त्यांना सोशल मिडीयाच्या रुपाने मिळताच वेगवेगळ्या अंगाने तो अभिव्यक्त होउ लागला. इंटरनेटवर उपलब्ध असणारी सार्‍या साधनसामुग्रीचा वापर करत स्वतःचे साहित्य, स्वतःचे विश्व नव्याने चितारण्याचा केलेला प्रयत्न हा त्या वर्गाने स्वतःसाठी तयार केलेलं एक प्रकारंच भांडवलंच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा जोतिबा फुले हे त्यांच्या ज्ञानसंग्रहाकडे ते सोशल कॅपिटलच्या कोनातूनच पाहत असत. वर्तमान स्थितीत जर बाबासाहेब असते तर कदाचित अत्याधुनिक साधनांच्या मदतीने त्यांच्या ज्ञानाचा अधिक पटीने आपल्याला फायदा करून घेता आला असता. 

लॉगीन या सदरातील अनेक लेखांमधून आपण नवनवीन संकल्पनांचा परिचय करून घेतला. सोशल नेटवर्किंगच्या जगात कशा तर्‍हेने क्षणाक्षणाला सगळंच अपडेट होत असतं याचाही वेळोवेळी मागोवा घेत राहीलो. जगातील महाकाय अर्थव्यवस्था मंदीच्या जाळ्यात अडकल्या, अनेक मातब्बर बँकर बुडाले, कैक उद्योगपतींचे उद्योग हॅक झाले, परंतू सायबर इंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग असेलल्या सोशल नेटवर्किंग साईट्सची उलाढाल आधीपेक्षा अधिक वेगाने फोफावत राहीली आणि ह्याच वेगाने वाढत राहील. त्याचं एकच प्रमुख कारण, इंटरनेट कमॉडिटी असलेलं सोशल नेटवर्किंगचं सोशल कॅपिटल मध्ये झालेलं रुपांतर.
‘सोशल कॅपिटल’, शब्द थोडासा अनोळखी वाटतो ना. साधारणपणे लिक्वीड कॅपिटल, ह्यूमन कॅपिटल, इंटेलेक्चुअल कॅपिटल, टेक्निकल कॅपिटल सारख्या संकल्पना आपल्याला माहित आहेत. परंतू सोशल कॅपिटला तसा नेहमीच्या वापरातला नाही. अगदी एरिस्टॉटल पासून ते जेम्स कोलमन पर्यंतच्या शेकडो विद्वानांनी सोशल कॅपिटलची व्याख्या आणि त्यासंदर्भातील हजारो थेअरीज मांडून ठेवल्या आहेत. परंतू गेल्या शतकातील ९० च्या दशकापासून, जागतिकिकरणाचा प्रसार झाल्यानंतर खर्‍या अर्थाने सोशल कॅपिटलच्या जडणघडणीची सुरूवात झाली. संपर्क साधनांचा झालेला विकास त्यास कारणीभूत होता. सोशल नेटवर्किंगच्या उदयाने तर सोशल कॅपिटलचं अस्तित्वच मान्य झालं. सोशल कॅपिटलचा साधासरळ अर्थ म्हणजे एखाद्या विशिष्ट ध्येयाने एकत्रित आलेल्या किंवा प्रेरित झालेल्या व्यक्तिसमुहाने उभे केलेले अथवा त्यांच्या रुपाने उभे राहीलेले भांडवल. यात पैसा हा मुख्य नसतो तर समूहभावना, विश्वास, सहकार्य, आणि सामुदिक पद्धतीने भाग भांडवल आणि मनुष्यबळ निर्माण करण्याची प्रोसेस महत्त्वाची असते. नेमकं हेच सोशल कॅपिटल उभारण्यासाठीचा प्लॅटफॉर्म सोनेसांनी उपलब्ध करून दिला.
ऑनलाईन कम्यूमिटीज ह्या शेअर्ड (कॉमन) इंटरेस्ट जोपासणार्‍या नेटकर्‍यांना एकाच ठिकाणी एकत्रित होउन विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी मिळवून देतात. आणि नेमका हाच शेअर्ड इंटरेस्ट सोशल कॅपिटलचे जाळे विणण्यासाठी मदत करत असतो.  फेस-टू-फेस पद्धतीपेक्षा वर्चूअल नेटवर्क फार वेगाने उभारता येते आणि ते सोयीस्कर असल्याने फेसबुक, मायस्पेस, ट्विटर सारख्या साईट्स अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या.
जास्मीन रिव्हॉल्यूशनच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास सर्व आखाती राष्ट्रांतील उत्स्फूर्त जनआंदोलने ही सोशल मिडीयाने तयार केलेल्या सोशल कॅपिटलवरच उभी राहीली होती. आपल्या भारतात अण्णा हजारेंच्या गतवर्षीच्या आंदोलनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यात भ्रष्टाचाराविरोधातील कॉमन इंटरेस्ट शेअर करणार्‍यांच्या नेटकर्‍यांचा मोठा वाटा होता. सध्याच्या घडीला भारतातील सोशल मिडिया हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहीलेला नसून त्याचा जास्तीत जास्त वापर हा माहिती व ज्ञान संग्रहासोबत त्या माहिती व ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो आहे. जगातील सर्वात मोठ्या एनसायक्लोपीडीयाचे दालन या सोशल मिडीयाने आपणा सर्वांसाठी खुले केले. हाच माहिती संग्रह व ज्ञान संग्रहच सोशल मिडीयाचे सामाजिक भांडवल म्हणजे सोशल कॅपिटल आहे.
आजच्या घडीला भारतात सोशल मिडीया वापरकर्त्यांमध्ये माध्यमहीन वर्गाचा वरचष्मा दिसून येतो. त्यांचे शेअर्ड इंटरेस्ट जपणारे माध्यम त्यांना सोशल मिडीयाच्या रुपाने मिळताच वेगवेगळ्या अंगाने तो अभिव्यक्त होउ लागला. इंटरनेटवर उपलब्ध असणारी सार्‍या साधनसामुग्रीचा वापर करत स्वतःचे साहित्य, स्वतःचे विश्व नव्याने चितारण्याचा केलेला प्रयत्न हा त्या वर्गाने स्वतःसाठी तयार केलेलं एक प्रकारंच भांडवलंच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा जोतिबा फुले हे त्यांच्या ज्ञानसंग्रहाकडे ते सोशल कॅपिटलच्या कोनातूनच पाहत असत. वर्तमान स्थितीत जर बाबासाहेब असते तर कदाचित अत्याधुनिक साधनांच्या मदतीने त्यांच्या ज्ञानाचा अधिक पटीने आपल्याला फायदा करून घेता आला असता. माहिती व सूचना प्रसारण क्षेत्रांतील आमुलाग्र व वैविध्यपूर्ण बदलांमुळे मानवी जीवनात परिवर्तन घडून आले.  गेल्या दशकभरापर्यंत माध्यमांतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सत्यता ही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीयाच्या मर्जीवरच दाखवली जायची.
आज हजारो वेबसाईट स्वतःचे स्वतंत्र विचारपीठ घेउन उभी आहे. जेथे माहितीची किंवा बातमीची समीक्षा करण्यास वाव आहे. त्यामुळेच माहीती प्रसारणाच्या क्षेत्रातील फसवणूकीला आळा बसला. लोकांचे विचार जुळू लागले. त्यांच्या कामाची, विचारांची, ध्येय्य आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सोशल मिडीयावरूनच अनेकांनी एकत्र येउन संघटना उभारायला देखील सुरूवात केलीये. अनेकांनी छोटे मोठे उद्योग सुरू केलेत. त्यांची जाहीरातबाजी देखील सोशल मिडीयावरूनच केली जाते, कारण त्यांचा ग्राहक देखील तेथेच असतो.
थोडक्यात सोशल मिडीयाने जन्माला घातलेल्या सोशल कॅपिटलचा वापर खेळत्या भांडवलासारखा करायचा असेल तर उच-नीचतेच्या विचारांना, ज्येष्ठ-कनिष्ठ पणाच्या वागणूकीला, सर्व प्रकारच्या भेदभावनांना मातीत गाडावे लागेल. सोशल मिडीया ह्या मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या साखळ्या आहेत. कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही. कारण हा व्यक्तीकेंद्रित खेळ नाही. या ठिकाणी समुहाचा विचार होतो. समाजातील एका समान विचारधारेच्या वर्गाचा विचार होत असतो. येथे प्रत्येकाला स्पर्धेला तोंड द्यावे लागते. सोशल मिडीयाने उभारलेले सोशल कॅपिटल हे अमेरिकेतील खुल्या अर्थव्यवस्थेत जगणार्‍या अनेक तरुणांनी खुप आधीच हेरले आणि त्यादृष्टीने मार्गक्रमण केले. त्याचा परिणाम आपण फेसबुक, गुगल, ट्विटर, विंडोज च्या रुपात पाहतच आहोत. त्यांनी आपल्याला सोशल मिडीया दिला, त्यावर अनलिमिटेड, सेंसॉरलेस एक्सेस देखील दिला. परंतू त्या सोशल मिडीयाचे आपण सोशल कॅपिटल बनवून त्यांना अब्जावधींचा नफा मिळवून देत आहोत. म्हणून येणार्‍या काळात जो सोशल मिडीयामध्ये काही ना काही नवं घेउन येण्याचा प्रयत्न करत राहील तोच या कॅपिटलचा खरा मालक राहील.

ग्रेटेनेस मनापासून स्विकारतील का ?


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावाच्या महान वादळांनं हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातीव्यवस्थेच्या आणि अनिष्ट रुढींच्या मुळावरच थेट घाव घातला. भारताचा समाजेतिहासच बदलून टाकण्याचे काम फक्त बाबासाहेबच करू शकले. नुकत्याच एका खाजगी वृत्तसमुहाने, एका बड्या उद्योगसमुहाच्या स्पॉंसरशिपवर आयोजित केलेल्या स्पर्धेत बाबासाहेबांना ग्रेटेस्ट इंडियन आफ्टर गांधी म्हणून घोषित केले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६५ वर्षांत जवळपास सर्वच प्रसारमाध्यमांनी बाबासाहेबांना कायमच राष्ट्रीय नेते म्हणून नाकारताना केवळ अस्पृश्यांचे नेते म्हणून ओळख दिली.  आणि आता अचानक बाबासाहेबांप्रती प्रेमाचं आलेलं भरतं माझ्यासारख्या अनेकांना निश्चितच बुचकळ्यात टाकणारं होतं. खरंच अशा प्रकारच्या स्पर्धांनी काही फायदा होतो का ? त्या निमित्ताने…
कॉपी करण्यात आणि एखाद्याचे सर्टिफिकेशन करण्यात आपण भारतीयांचा हात कोणीही धरू शकणार नाही. बीबीसी ने आयोजित केलेल्या ग्रेटेस्ट ब्रिटीश या कार्यक्रमाची हुबेहुब नक्कल असलेला ग्रेटेस्ट इंडियन हा कार्यक्रम मात्र भारतात सीएनएन-आयबीएन, आयबीएन-लोकमत तसेच हिस्ट्री चॅनलने आपल्या सोयीने मोल्ड केला. ग्रेटेस्ट इंडियन ठरविण्याऐवजी ग्रेटेस्ट इंडियन आफ्टर गांधी असा शो डिझाईन केला. आपल्याच कंपूतल्या २६ सदस्यांची ज्युरी म्हणून निवड केली. त्यांनी परस्परपणे गांधीना सर्वश्रेष्ठ जाहीर करून टाकलं. मग ज्यूरींनी ५० जणांची यादी सादर केली. त्या ५० जणांमधून ग्रेटेस्ट इंडियन (गांधीनंतरचा?) ठरविण्यासाठी एसएमएस, मिस्ड कॉलच्या मदतीने लोकांना वोट अपील केले गेले. पहिल्या टप्प्यापासूनच बाबासाहेब अगदी पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून होते ते अगदी निकाल लागेपर्यंत. १५ ऑगस्ट २०१२ ला दिल्लीत एका आलीशान कार्यक्रमात बाबासाहेब विजयी झाल्याची घोषणा केली गेली.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत या ना त्या कारणाने बाबासाहेबांचं ग्रेटेस्टपण आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये (भारत वगळता) अधोरेखित होत होतं. इथल्य़ा प्रसारमाध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली नसली तरी ते लपून राहत नव्हतं. कोलंबिया विद्यापीठीच्या सर्वोत्कृष्ट १०० विद्वान विद्यार्थ्यांच्या यादीत बाबासाहेब हे तिसर्‍या स्थानावर आहेत. मेकर्स ऑफ युनिव्हर्स च्या अख्ख्या सिरीजमध्ये गेल्या दहा हजार वर्षांतील निवडक १०० धुरंधरांमध्ये भगवान बुद्ध, सम्राट अशोक, भगवन महावीर यांच्या सोबतीने स्थान दिले गेलेले आहे. या यादीत गांधीचा कोठेही समावेश नाही. मग अशा अवस्थेत गांधीनंतरचा श्रेष्ठ (ग्रेटेस्ट) भारतीय म्हणून बाबासाहेबांना दिलेला पुरस्कार हा खरे तर बाबासाहेबांच्या कार्याचे केलेले अवमुल्यनच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्रेष्ठ आहेत की नाहीत किंवा ते कोणानंतर श्रेष्ठ आहेत याचे दाखले कोणीच मागितले नव्हते किंवा खोडसाळपणा करण्याची देखील आत्ता काही एक गरज नव्हती. खरे पाहता ही स्पर्धा भांडवलशाहीतील एक बाजारमुलक व्यवस्थेचे एक प्रतिकच होती. जेथे फायद्यासाठी कोणाचेही मुल्य लावले जाते. म्हणूनच ह्या स्पर्धेला नैतिकदृष्ट्या काही अर्थच उरत नाही. त्याची कारणे पुढीलप्रमाणे..
  1. महात्मा गांधीजींना आपल्याच मोजक्या २६ ज्यूरी मित्रांकडून परस्पर सर्वोश्रेष्ठ ठरवून मुख्य स्पर्धेतून बाजूला केले गेले. म्हणून ह्या स्पर्धेतील इलेक्शन हे अनफेअर इलेक्शन होते.
  2. ५० मुख्य उमेदवारांमध्ये केवळ ६ महिला उमेदवारांचा केलेला समावेश ही न पटणारी गोष्ट होती.
  3. रिलायंस फाउंडेशनने प्रायोजित केलेल्या प्रकल्पात धीरुभाई अंबानींचे नाव देखील होते. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजक स्वतः स्पर्धक म्हणून उतरले असावेत.
  4. आयबीएन वृत्तसमुहाच्या सर्व संपादक आणि स्पर्धेचे सर्व ज्युरी यांनी गांधीजींना परस्पर सर्वश्रेष्ठ ठरवून टाकले त्यासाठी त्यांनी गांधीजीना कोणते निकष लावले याचे कोणतेही स्पष्टिकरण दिलेले नाही.
  5. जगभरात बाबासाहेबांची ओळख Father of Modern India, Father of Indian Constitution अशी आहे. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदेशिक्षण, पर्यावरण, उर्जाक्षेत्र, संरक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, धर्मसंस्था असा चौफेर आवाका असणार्‍या बाबासाहेबांना  संपूर्ण स्पर्धेदरम्यान दलिंताचे उद्धारक म्हणून संकुचित करण्याचा कोतेपणा केला गेला.
    http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html
  6. गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान त्यांना या देशाचा एक महान नेता बनवते यात काहीच शंका नाही. परंतू त्यामुळे स्वातंत्र्यचळवळीत मोलाचं कार्य करणारे किंवा त्यांच्याआधी असीम त्याग आणि शौर्यांच प्रदर्शन करणाऱ्या भगतसिंग सारख्या अनेकांवर केलेला हा अन्याय नाही का ? याउलट ग्रेटेस्ट ब्रिटीश मध्ये १४ व्या शतकापासून च्या व्यक्तिंना ग्राह्य धरले गेले आहे.
  7. वास्तविक पाहता ही स्पर्धा सर्वोच्च भारतीय निवडण्याची नव्हती तर गांधीनंतरचा दुसर्‍या क्रमांकावरील श्रेष्ठ ठरवण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा होती. गांधी विरूद्ध आंबेडकर हा वैचारिक, तात्विक वाद २० व्या शतकातील महत्त्वाचा विषय. त्या वादाला पुन्हा नव्याने तोंड फोडले गेले. समान प्रतिनिधित्व नाकारण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून उपोषण करणारे गांधी कुठे आणि केवळ गांधीचे प्राण वाचवण्यासाठी पुणे कराराद्वारे स्वतःच्या मानवी हक्कांची आहूती देणारे बाबासाहेब कुठे ? कोणत्या अँगलने श्रेष्ठत्वाची परिमाणे लावायची ?
  8. सदर स्पर्धेत बाबासाहेब जिंकल्यांनंतर देखील त्यांचे श्रेष्ठत्व सार्‍या भारतीयांना (सवर्ण) मान्य झालेच असेल का ? समान प्रतिनिधित्वाचा पुरस्कार करणार्‍या आरक्षण धोरणांचा स्विकार सर्वजण करतील का ? कोणते बदल लगेच घडून आले ? आणि बदल इथल्या शोषित वंचितांच्या आयुष्यात घडून येण्याच्या मार्गावर आहेत ?
  9. आपल्या देशात आजवर बाबासाहेबांसारखा मोठा अनुयायी वर्ग लाभलेला एकही महापुरूष घडलेला नाही. एन शिवराज यांनी यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हटले होते. Dead Ambedkar is more dangerous than living Ambedkar.  आज ४७ वर्षांनंतरही त्यांच्या अनुयायांचे राजकीयदृष्ट्या असलेले महत्त्व  हे केवळ Leaderless Political Vote bank एवढेच आहे.
  10. देशातील मजूर-कामगार वर्गाच्या हितार्थ घेतलेले निर्णय, स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून कामगारांसाठी केलेले भरीव कार्य, आठ तासांचा कामाचा दिवस ही कामगारांना दिलेली बहुमूल्य देणगी, ऊर्जा संरक्षण, भाक्रा-नांगल प्रकल्प, दामोदर प्रकल्प, नद्याजोडणी प्रकल्प, स्त्रियांना संपत्तीत समान वाटा, महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, बाळंतपणाच्या काळात मिळणारी हक्काची भरपगारी रजा यासारख्या अनेक बहुमुल्य देणग्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. बॅ. जिन्ना यांनी रक्तरंजित मार्ग स्विकारून पाकिस्तानची निर्मिती करून घेतली. याउलट रक्तहिन क्रांतीचा मार्ग अवलंबवून लाखोंच्या समुदायाला बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या खोल खाईतून बाहेर खेचून काढले. आणि भारताचे अखंडत्व शाबूत ठेवले. बाबासाहेबांना ग्रेट मानल्यानंतर देखील बाबासाहेबांनी या देशाच्या नवनिर्मीतीसाठी केलेले कार्य प्रसारमाध्यमे देशासमोर मांडतील का ?

प्रत्येकाचे योगदान हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोलाचे असते. कारण त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्या त्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आलेले असतात. देशाच्या नवनिर्मितीमध्ये योगदान देणार्‍या प्रत्येकाच्या कार्याचे मुल्यमापन जरूर व्हायला हवे परंतू त्यांचे केले गेलेले श्रेणीबद्ध मुल्यमापन एकाला श्रेष्ठ आणि इ्तरांना कनिष्ठ ठरविण्यासाठीच असते. म्हणून ग्रेटेस्ट इंडियन सारख्या स्पर्धा ह्या बाबासाहेबांच्या असामान्यत्वाला, त्यांच्या विद्वत्तेला आणि या देशाप्रती असलेल्या योगदानाला सामान्य करणार्‍या ठरतात.
फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून घडून आलेल्या संपर्कक्रांतीने बहुजन समाजाच्या व्यक्त होण्याच्या कक्षा रुंदावल्या. त्यांचे नायक त्यांच्याच शब्दांतून व्यक्त होउ लागले. गावागावात, खेडोपाड्यात, शहरातील कोपर्‍यात आयुष्य जगणारे सोशल नेटवर्किंगचा आधार घेउन एकत्र येउ लागले. त्यातून सोशल कॉंटॅक्टस वाढवण्याची एक अभूतपूर्व साखळी अस्तित्वात आली. कोणत्याही प्रकारची साधनसंपत्ती, कोणतंही कॅपिटल नसलेल्या एका मोठ्या वर्गाने स्वतःचं सोशल कॅपिटल ह्या संपर्कशृंखलेतून निर्माण केलं. नेमक्या ह्याच सोशल कॅपिटलच्या जोरावर बाबासाहेबांना ग्रेटेस्ट इंडियनच्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भरघोस मते मिळाली. बर्‍याच उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले. त्यात गांधी घराण्याचे सदस्य देखील होतेच. परिवर्तनवादी आंदोलनातील महापुरुषांनीच या देशाला तारून धरले. घडविले. निर्मिले. हा देश त्यांच्या कार्याला सदैव नतमस्तक होत राहील. थोडक्यात एवढंच म्हणता येईल..
जेव्हा निर्णय घेण्याची ताकद सामान्य जनतेकडे सोपवली गेली तेव्हा त्यांनी त्यांचा नायक ठरविला. गेल्या पासष्ट वर्षातील भारतीय लोकशाही आणि समाजमन हे टप्याटप्याने परिपक्व होत चालले आहे. प्रत्येक क्षेत्रात पोजिशनिंग बदलत चालली आहे. नायक-खलनायक-मुकनायक यांच्या पोझिशन्स नव्याने ठरविल्या जात आहेत. समान प्रतिनिधीत्व असणार्‍या प्रबुद्ध भारताच्या ह्या वाटचाल गतिमान होत आहे.