Friday, 7 September 2012

ग्रेटेनेस मनापासून स्विकारतील का ?


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावाच्या महान वादळांनं हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातीव्यवस्थेच्या आणि अनिष्ट रुढींच्या मुळावरच थेट घाव घातला. भारताचा समाजेतिहासच बदलून टाकण्याचे काम फक्त बाबासाहेबच करू शकले. नुकत्याच एका खाजगी वृत्तसमुहाने, एका बड्या उद्योगसमुहाच्या स्पॉंसरशिपवर आयोजित केलेल्या स्पर्धेत बाबासाहेबांना ग्रेटेस्ट इंडियन आफ्टर गांधी म्हणून घोषित केले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६५ वर्षांत जवळपास सर्वच प्रसारमाध्यमांनी बाबासाहेबांना कायमच राष्ट्रीय नेते म्हणून नाकारताना केवळ अस्पृश्यांचे नेते म्हणून ओळख दिली.  आणि आता अचानक बाबासाहेबांप्रती प्रेमाचं आलेलं भरतं माझ्यासारख्या अनेकांना निश्चितच बुचकळ्यात टाकणारं होतं. खरंच अशा प्रकारच्या स्पर्धांनी काही फायदा होतो का ? त्या निमित्ताने…
कॉपी करण्यात आणि एखाद्याचे सर्टिफिकेशन करण्यात आपण भारतीयांचा हात कोणीही धरू शकणार नाही. बीबीसी ने आयोजित केलेल्या ग्रेटेस्ट ब्रिटीश या कार्यक्रमाची हुबेहुब नक्कल असलेला ग्रेटेस्ट इंडियन हा कार्यक्रम मात्र भारतात सीएनएन-आयबीएन, आयबीएन-लोकमत तसेच हिस्ट्री चॅनलने आपल्या सोयीने मोल्ड केला. ग्रेटेस्ट इंडियन ठरविण्याऐवजी ग्रेटेस्ट इंडियन आफ्टर गांधी असा शो डिझाईन केला. आपल्याच कंपूतल्या २६ सदस्यांची ज्युरी म्हणून निवड केली. त्यांनी परस्परपणे गांधीना सर्वश्रेष्ठ जाहीर करून टाकलं. मग ज्यूरींनी ५० जणांची यादी सादर केली. त्या ५० जणांमधून ग्रेटेस्ट इंडियन (गांधीनंतरचा?) ठरविण्यासाठी एसएमएस, मिस्ड कॉलच्या मदतीने लोकांना वोट अपील केले गेले. पहिल्या टप्प्यापासूनच बाबासाहेब अगदी पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून होते ते अगदी निकाल लागेपर्यंत. १५ ऑगस्ट २०१२ ला दिल्लीत एका आलीशान कार्यक्रमात बाबासाहेब विजयी झाल्याची घोषणा केली गेली.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत या ना त्या कारणाने बाबासाहेबांचं ग्रेटेस्टपण आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये (भारत वगळता) अधोरेखित होत होतं. इथल्य़ा प्रसारमाध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली नसली तरी ते लपून राहत नव्हतं. कोलंबिया विद्यापीठीच्या सर्वोत्कृष्ट १०० विद्वान विद्यार्थ्यांच्या यादीत बाबासाहेब हे तिसर्‍या स्थानावर आहेत. मेकर्स ऑफ युनिव्हर्स च्या अख्ख्या सिरीजमध्ये गेल्या दहा हजार वर्षांतील निवडक १०० धुरंधरांमध्ये भगवान बुद्ध, सम्राट अशोक, भगवन महावीर यांच्या सोबतीने स्थान दिले गेलेले आहे. या यादीत गांधीचा कोठेही समावेश नाही. मग अशा अवस्थेत गांधीनंतरचा श्रेष्ठ (ग्रेटेस्ट) भारतीय म्हणून बाबासाहेबांना दिलेला पुरस्कार हा खरे तर बाबासाहेबांच्या कार्याचे केलेले अवमुल्यनच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्रेष्ठ आहेत की नाहीत किंवा ते कोणानंतर श्रेष्ठ आहेत याचे दाखले कोणीच मागितले नव्हते किंवा खोडसाळपणा करण्याची देखील आत्ता काही एक गरज नव्हती. खरे पाहता ही स्पर्धा भांडवलशाहीतील एक बाजारमुलक व्यवस्थेचे एक प्रतिकच होती. जेथे फायद्यासाठी कोणाचेही मुल्य लावले जाते. म्हणूनच ह्या स्पर्धेला नैतिकदृष्ट्या काही अर्थच उरत नाही. त्याची कारणे पुढीलप्रमाणे..
  1. महात्मा गांधीजींना आपल्याच मोजक्या २६ ज्यूरी मित्रांकडून परस्पर सर्वोश्रेष्ठ ठरवून मुख्य स्पर्धेतून बाजूला केले गेले. म्हणून ह्या स्पर्धेतील इलेक्शन हे अनफेअर इलेक्शन होते.
  2. ५० मुख्य उमेदवारांमध्ये केवळ ६ महिला उमेदवारांचा केलेला समावेश ही न पटणारी गोष्ट होती.
  3. रिलायंस फाउंडेशनने प्रायोजित केलेल्या प्रकल्पात धीरुभाई अंबानींचे नाव देखील होते. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजक स्वतः स्पर्धक म्हणून उतरले असावेत.
  4. आयबीएन वृत्तसमुहाच्या सर्व संपादक आणि स्पर्धेचे सर्व ज्युरी यांनी गांधीजींना परस्पर सर्वश्रेष्ठ ठरवून टाकले त्यासाठी त्यांनी गांधीजीना कोणते निकष लावले याचे कोणतेही स्पष्टिकरण दिलेले नाही.
  5. जगभरात बाबासाहेबांची ओळख Father of Modern India, Father of Indian Constitution अशी आहे. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदेशिक्षण, पर्यावरण, उर्जाक्षेत्र, संरक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, धर्मसंस्था असा चौफेर आवाका असणार्‍या बाबासाहेबांना  संपूर्ण स्पर्धेदरम्यान दलिंताचे उद्धारक म्हणून संकुचित करण्याचा कोतेपणा केला गेला.
    http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html
  6. गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान त्यांना या देशाचा एक महान नेता बनवते यात काहीच शंका नाही. परंतू त्यामुळे स्वातंत्र्यचळवळीत मोलाचं कार्य करणारे किंवा त्यांच्याआधी असीम त्याग आणि शौर्यांच प्रदर्शन करणाऱ्या भगतसिंग सारख्या अनेकांवर केलेला हा अन्याय नाही का ? याउलट ग्रेटेस्ट ब्रिटीश मध्ये १४ व्या शतकापासून च्या व्यक्तिंना ग्राह्य धरले गेले आहे.
  7. वास्तविक पाहता ही स्पर्धा सर्वोच्च भारतीय निवडण्याची नव्हती तर गांधीनंतरचा दुसर्‍या क्रमांकावरील श्रेष्ठ ठरवण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा होती. गांधी विरूद्ध आंबेडकर हा वैचारिक, तात्विक वाद २० व्या शतकातील महत्त्वाचा विषय. त्या वादाला पुन्हा नव्याने तोंड फोडले गेले. समान प्रतिनिधित्व नाकारण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून उपोषण करणारे गांधी कुठे आणि केवळ गांधीचे प्राण वाचवण्यासाठी पुणे कराराद्वारे स्वतःच्या मानवी हक्कांची आहूती देणारे बाबासाहेब कुठे ? कोणत्या अँगलने श्रेष्ठत्वाची परिमाणे लावायची ?
  8. सदर स्पर्धेत बाबासाहेब जिंकल्यांनंतर देखील त्यांचे श्रेष्ठत्व सार्‍या भारतीयांना (सवर्ण) मान्य झालेच असेल का ? समान प्रतिनिधित्वाचा पुरस्कार करणार्‍या आरक्षण धोरणांचा स्विकार सर्वजण करतील का ? कोणते बदल लगेच घडून आले ? आणि बदल इथल्या शोषित वंचितांच्या आयुष्यात घडून येण्याच्या मार्गावर आहेत ?
  9. आपल्या देशात आजवर बाबासाहेबांसारखा मोठा अनुयायी वर्ग लाभलेला एकही महापुरूष घडलेला नाही. एन शिवराज यांनी यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हटले होते. Dead Ambedkar is more dangerous than living Ambedkar.  आज ४७ वर्षांनंतरही त्यांच्या अनुयायांचे राजकीयदृष्ट्या असलेले महत्त्व  हे केवळ Leaderless Political Vote bank एवढेच आहे.
  10. देशातील मजूर-कामगार वर्गाच्या हितार्थ घेतलेले निर्णय, स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून कामगारांसाठी केलेले भरीव कार्य, आठ तासांचा कामाचा दिवस ही कामगारांना दिलेली बहुमूल्य देणगी, ऊर्जा संरक्षण, भाक्रा-नांगल प्रकल्प, दामोदर प्रकल्प, नद्याजोडणी प्रकल्प, स्त्रियांना संपत्तीत समान वाटा, महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, बाळंतपणाच्या काळात मिळणारी हक्काची भरपगारी रजा यासारख्या अनेक बहुमुल्य देणग्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. बॅ. जिन्ना यांनी रक्तरंजित मार्ग स्विकारून पाकिस्तानची निर्मिती करून घेतली. याउलट रक्तहिन क्रांतीचा मार्ग अवलंबवून लाखोंच्या समुदायाला बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या खोल खाईतून बाहेर खेचून काढले. आणि भारताचे अखंडत्व शाबूत ठेवले. बाबासाहेबांना ग्रेट मानल्यानंतर देखील बाबासाहेबांनी या देशाच्या नवनिर्मीतीसाठी केलेले कार्य प्रसारमाध्यमे देशासमोर मांडतील का ?

प्रत्येकाचे योगदान हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोलाचे असते. कारण त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्या त्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आलेले असतात. देशाच्या नवनिर्मितीमध्ये योगदान देणार्‍या प्रत्येकाच्या कार्याचे मुल्यमापन जरूर व्हायला हवे परंतू त्यांचे केले गेलेले श्रेणीबद्ध मुल्यमापन एकाला श्रेष्ठ आणि इ्तरांना कनिष्ठ ठरविण्यासाठीच असते. म्हणून ग्रेटेस्ट इंडियन सारख्या स्पर्धा ह्या बाबासाहेबांच्या असामान्यत्वाला, त्यांच्या विद्वत्तेला आणि या देशाप्रती असलेल्या योगदानाला सामान्य करणार्‍या ठरतात.
फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून घडून आलेल्या संपर्कक्रांतीने बहुजन समाजाच्या व्यक्त होण्याच्या कक्षा रुंदावल्या. त्यांचे नायक त्यांच्याच शब्दांतून व्यक्त होउ लागले. गावागावात, खेडोपाड्यात, शहरातील कोपर्‍यात आयुष्य जगणारे सोशल नेटवर्किंगचा आधार घेउन एकत्र येउ लागले. त्यातून सोशल कॉंटॅक्टस वाढवण्याची एक अभूतपूर्व साखळी अस्तित्वात आली. कोणत्याही प्रकारची साधनसंपत्ती, कोणतंही कॅपिटल नसलेल्या एका मोठ्या वर्गाने स्वतःचं सोशल कॅपिटल ह्या संपर्कशृंखलेतून निर्माण केलं. नेमक्या ह्याच सोशल कॅपिटलच्या जोरावर बाबासाहेबांना ग्रेटेस्ट इंडियनच्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भरघोस मते मिळाली. बर्‍याच उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले. त्यात गांधी घराण्याचे सदस्य देखील होतेच. परिवर्तनवादी आंदोलनातील महापुरुषांनीच या देशाला तारून धरले. घडविले. निर्मिले. हा देश त्यांच्या कार्याला सदैव नतमस्तक होत राहील. थोडक्यात एवढंच म्हणता येईल..
जेव्हा निर्णय घेण्याची ताकद सामान्य जनतेकडे सोपवली गेली तेव्हा त्यांनी त्यांचा नायक ठरविला. गेल्या पासष्ट वर्षातील भारतीय लोकशाही आणि समाजमन हे टप्याटप्याने परिपक्व होत चालले आहे. प्रत्येक क्षेत्रात पोजिशनिंग बदलत चालली आहे. नायक-खलनायक-मुकनायक यांच्या पोझिशन्स नव्याने ठरविल्या जात आहेत. समान प्रतिनिधीत्व असणार्‍या प्रबुद्ध भारताच्या ह्या वाटचाल गतिमान होत आहे.


No comments:

Post a Comment