Friday, 7 September 2012

अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्टस- आजच्या संदर्भात



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट्’ या ग्रंथास ७५ वर्ष पूर्ण झाली. त्याच वर्षात सातारा जिल्ह्यात आंतरजातीय विवाहांमुळे दोन गंभीर घटना घडल्या. पहिल्या घटनेत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दोन भिन्नजातीय मुलगा (मांग) व उच्चजातीय मुलगी (मराठा) पळून गेल्याने मुलाच्या ’विधवा’ आईस मारहाण करण्यात आली तर दुसर्‍या घटनेत आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा असलेल्या मुलीची तिच्या वडिलांनी हत्या केली.
भारतीय उपखंडातील जात आणि पितृसत्ता यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण संबंध विवाहसंस्थेत दिसून येतो. बाबासाहेबांच्या मते ’जातिअंतर्गत विवाह हेच जातीचे व्यवच्छेदक लक्षण ठरते’. भारतीय समाजातील जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ब्राम्हणी मुल्यव्यवस्थेने विवाहसंस्था व पितृसत्ताकता यांचा आधार घेतला. ’रक्त संबंधानेच आपुलकीची भावना निर्माण होते.सामाजिक जीवनात एकसुत्रीपणा आणणारी शक्ती या दृष्टीने हिंदूना आंतरजातीय विवाहाची अत्यंत आवश्यकता आहे’ असे मत बाबासाहेबांनी ’अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट्स’ या ग्रंथातून मांडले.भारतीय समाजातील वास्तव मात्र हरियाना राज्यातील खाप पंचायतींद्वारे (जात पंचायती) होणारे ’ऑनर किलिंग- प्रतिष्ठिचे बळी’ तसेच पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रातील गेल्या महिन्यातील या दोन घटना असे आहे. आंतरजातीय विवाह करणे आजही समाजात अप्रतिष्टित मानले जाते.प्रत्येक जातीला आपल्या जातीच्या शुध्दतेसाठी जातीअंतर्गत विवाह गरजेचे वाटतात.
भारतातील बहुतांशी आंतरजातीय विवाह प्रेमसंबंधातूनच होतात. ठरवून दुसर्‍या जातीतील पुरुषाशी/स्त्रीशी विवाह करण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. म्हणजेच प्रेमसंबंधाशिवाय आंतरजातीय विवाह असू शकतात ही कल्पनाच समाजाला पटणे अशक्यप्राय आहे. हरियानामध्ये खाप पंचायतीद्वारे आंतरजातीय प्रेमविवाह मान्य केले जात नाहीत व अशा जोडप्यांची हत्या करण्यात येते. त्यातही दोन उच्च जातींमध्ये प्रेमविवाह घडून आला तर शासन त्याला संरक्षण देते परंतु कनिष्ट व उच्च जातीमधील विवाहांना संरक्षण दिले जात नाही. महाराष्ट्रामध्येही अनेक वर्तमानपत्रामध्ये विवाहविषयक जाहिरातींमध्ये आंतरजातीय/उच्चआंतरजातीय चालेल परंतु ’SC/ST क्षमस्व’ अशा जाहिराती दिलेल्या असतात. आंतरजातीय प्रेमविवाहाच्या अनेक मर्यादा व अडचणी आहेत.
१) आंतरजातीय प्रेमविवाह न होण्याला सर्वात महत्वाची अडचण म्हणजे कुटुंब,शेजारी यांच्याद्वारे होणारे सामाजिकीकरण होय.विशिष्ट जातीतील मुलाला/मुलीला कुटुंबाद्वारे जातीच्या संस्कारातून त्या जातजाणिवेचे सामाजिकीकरण केले जाते. त्यातून ’आपले’ व ’परके’ या संद्न्या मुलाच्या/मुलीच्या जाणिवेमध्ये व नेणिवेमध्ये जातात. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये जातीच्या व वर्गाच्या जाणिवेमधून मुलामुलींचे गट निर्माण होतात. परिणामी प्रेमविवाह झाला तरी तो जातिअंतर्गत व वर्गाअंतर्गतच होतो. माझ्या अनेक मित्रांची प्रेम करतानाची एक अट ’जातवाली पाहिजे’ अशी आहे.
२) आंतरजातीय प्रेमविवाहाची एक महत्वाची मर्यादा म्हणजे अपत्याला चिटकणारी पित्याची जात हे होय. म्हणजेच भारतीय समाजातील पितृसत्ताकता नष्ट केल्याखेरीज जातिव्यवस्थेचे विध्वंसन करणे अशक्यप्राय ठरते. त्याचप्रमाणे प्रेमविवाह करताना ते क्रांतीकारी उद्देशानेच केले जातात असे नाही. परिणामी आंतरजातीय प्रेमविवाहानंतरही पुरुषाच्या व स्त्रीच्या जातजाणिवा तशाच राहतात. तसेच आंतरजातीय विवाहदेखील ’वर्गाचा दर्जा’ पाहूनच केले जातात. त्यामुळे आंतरजातीय विवाह ही क्रांती न ठरता केवळ एक सुधारणाच ठरते.
अशा अनेक अडचणी आणि मर्यादा असल्या तरी आंतरजातीय विवाह हा जातिअंतासाठी आवश्यक असणार्‍या अनेक उपायांपैकी एक महत्वाचा उपाय आहे. अशाप्रकारच्या विवाहांना सामाजिक मान्यता मिळत नाही. जातजाणिवांमुळे असे विवाह होत नाहीत व असे विवाह न झाल्यामुळे जातिव्यवस्था परत बळकट होते. म्हणजे कारण आणि परिणाम दोन्हीही जातिव्यवस्थाच आहे. महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात ब्राम्हण,मराठा व तत्सम उच्च जातींवर टीका करत असतो. परंतु आंतरजातीय विवाहांबद्दल दलितांची व बौद्धांची भूमिका काय आहे?
महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक विचारविश्वामध्ये बौद्धांना पुरोगामी मानले जाते. बामसेफ व तत्सम ब्राम्हणविरोधी संघटनांनी ब्राम्हण स्त्रीयांविरोधी अपप्रचार करुन ब्राम्हण स्त्रीया या आंबेडकरी चळवळीला संपविणार्‍या ’एजंट’ आहेत अशा स्वरुपाची मांडणी करत आंतरजातीय विवाहांना विरोध केला. महाराष्ट्रातील सुशिक्षित बौद्ध मध्यमवर्गीयांमध्ये अशी मांडणी बहुतेक प्रमाणात स्वीकारल्याचे दिसून येते. त्यामुळे ब्राम्हण व बौद्ध यांच्यातील द्वेष अजूनच वाढून जातिव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. बामसेफमध्ये नसलेल्या किंवा ती विचारधारा नाकारणार्‍या बौद्धांमध्येही आंतरजातीय विवाह ही अप्रतिष्टित समजली जाणारी बाब आहे. त्यांना नाइलाज म्हणून प्रेमसंबंधातून झालेले आंतरजातीय विवाह एकवेळ पटतील परंतु ठरवून बौद्धांमधील जातींमध्ये म्हणजेच ’महार-मांग’ असे विवाहदेखील घडून आल्याचे दिसत नाही. तात्पर्य आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारे बौद्ध लोक ’बारामाशी महारच’ पाहीजे असे म्हणत जातिअंतर्गत विवाह ’बौद्ध पद्धतीने’ करतात. लक्ष्मण माने यांनी बौद्ध धर्म स्वीकारतेवेळी म्हटले होते ’आमच्या जातीतील लोकांशी तुम्ही अगोदरच बौद्ध झालेल्या अस्पृश्य जातींनी जर लग्ने केली नाहीत तर आम्ही भटके विमुक्त आमच्याआमच्यात (४२ जाती) लग्ने करू. जातिअंतर्गत विवाह करण्याच्या नियमाचा त्याग न केल्याने बौद्ध धर्म स्वीकारलेल्या पूर्वीच्या अस्पृश्य जातींनी बौद्ध धर्मात जातिव्यवस्था निर्माण केली आहे.क्रांतीबा जोतीराव फुल्यांनी पुण्यामध्ये आंतरजातीय विवाह घडवून आणला होता. शाहू महाराजांनी ’आंतरजातीय-आंतरधर्मीय नोंदणी विवाह कायदा’ केला होता. तर बाबासाहेबांनी स्वतः दुसरा विवाह आंतरजातीय करुन आदर्श निर्माण केला होता.परंतु आंबेडकरी अनुयायांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
जागतिकीकरणानंतरच्या भारतात जात टिकवून ठेवण्यासाठी तंत्रद्न्यात्मक क्रांतीचा पुरेपूर वापर केला जात आहे. जागतिक बाजारपेठेतून पारंपारिक धर्म हे अधिकाधिक उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष होत जातील असा विचार अमेरिकन समाजशास्त्रज्ञ अ‍ॅलन वोल्फने मांडला होता. भारतामध्ये जे घडते आहे ते याच्या पूर्णतः विपरीत आहे. इंटरनेट व फेसबुकच्या माध्यमातून जातीच्या व धर्माच्या अस्मिता अधिक तीव्र व टोकदार होत आहेत. फेसबुकवर ’राज्य करेल तर फक्त ……..’ यामध्ये ’…….’ च्या जागी मराठा, वंझारी, धनगर, माळी, बौद्ध टाकून अशा इमेजेस तयार करून टाकण्यात येत आहेत. फेसबुकवर प्रत्येक जातीचे ग्रुप्स तयार केलेले आहेत. याद्वारे स्वजातीय विवाह इच्छुक तरुण तरुणींचा संपर्क वाढून जातिअंतर्गतच विवाह घडून येतात. या सर्वांचाच एक भाग म्हणजे विवाहविषयक वेबसाईट्स! शादी डॉट कॉम, भारत मॅट्रीमनी अशा निरनिराळ्या वेबसाईट्समधून जातिअंतर्गत विवाहांना उत्तेजन दिले जाते. अशा वेबसाईट्स मध्ये जातीचा उल्लेख प्रकर्षाने केलेला असतो. त्याचबरोबर ब्राम्हण मॅट्रीमनी, मराठा मॅट्रीमनी अशा जातवार वेबसाईट्स देखील उपलब्ध आहेत. ब्राम्हण मॅट्रीमनी या वेबसाईट वर तर गोत्रापासूनची माहिती भरावयाची असते. अशाप्रकारे भारतात उजव्या व नवभांडवली शक्ती एकत्रितपणे जातिव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसून येते.जातिनिहाय वधू-वर परिचय मेळाव्यांची जागा तंत्रज्ञान युगात अशा वेबसाईट्सनी घेतली आहे. ज्या मध्यमवर्गीयांना भारतातील जातिव्यवस्था संपली आहे असे वाटत असते त्यांनी वर्तमानपत्रातील विवाहविषयक जाहिराती व इंटरनेटवरील विवाहविषयक वेबसाईट्स अवश्य पहाव्यात.
तंत्रज्ञातून दृढ होणार्‍या अशा जातिअंतर्गत विवाहाच्या नियमनांना विरोध तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच होणे गरजेचे आहे. फेसबुकवर आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देणारे ग्रुप्स निर्माण करायला हवेत. तसेच आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देणार्‍या वेबसाईट्स, उदा.इंटरकास्ट मॅट्रीमोनी अशा वेबसाईट्स काढल्या जाव्यात व त्यांचा प्रसार व प्रचार केला जावा. याद्वारे आधुनिक साधनांच्या माध्यमातून पारंपारिक मुल्यविचार न पसरता आधुनिकच मुल्यांचा प्रसार होईल. तंत्रज्ञानातून पारंपारिक विचार पसरविले जात आहेत म्हणून तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याचा एक प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करायला हवा.
फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी वारसा सांगत फुले- आंबेडकरवादाच्या विरोधी आचरण करणार्‍या महाराष्ट्र शासनाची आंतरजातीय विवाहाबद्दलची भुमिका काय आहे? राज्यशासन आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यास फक्त ५० हजार रुपये देते. तेदेखील त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. समाजाने बहिष्कृत केलेल्या अशा जोडप्यांना प्रथम संरक्षणाची व आर्थिक मदतीची अपेक्षा असते. परंतु शासन मात्र याबाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणार्‍या जोड्प्यांसाठी एक नवा कायदा करण्याची गरज आहे. त्यामध्ये जोडप्याला व त्यांच्यामधील कनिष्ट जातीच्या मुलाला/मुलीला संरक्षण आणि जोडप्याला पुरेशी आर्थिक मदत या गोष्टी अंतर्भूत कराव्यात.
भारतातील जातीव्यवस्था ही उतरंडीच्या स्वरूपातील शोषणव्यवस्था आहे. जर ही शोषणव्यवस्था नष्ट करायची असेल तर जातिसंस्थेचा संस्थात्मक आधार असणारी विवाहसंस्था आमुलाग्र बदलावी लागेल.त्यासाठी आंतरजातीय विवाह अत्यंत आवश्यक आहेत.भारतातील सर्वच धर्मात जातीव्यवस्था आहे त्यामुळे सर्वच धर्मात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह झाले तरच जातिव्यव्स्थेचे विध्वंसन करणे शक्य होईल. आंतरजातीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये केवळ माणूस म्हणून जन्माला येतील.त्यातून जातिविरहीत व पितृसत्ताविरहीत समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरुन ’अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट्स’ या ग्रंथाचा उद्देश सफल होईल.
संदर्भ -
१. कास्ट्स इन इंडिया- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२. अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट्स- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३. द गॉड मार्केट- मीरा नंदा


No comments:

Post a Comment