आजच्या घडीला भारतात सोशल मिडीया वापरकर्त्यांमध्ये माध्यमहीन वर्गाचा वरचष्मा दिसून येतो. त्यांचे शेअर्ड इंटरेस्ट जपणारे माध्यम त्यांना सोशल मिडीयाच्या रुपाने मिळताच वेगवेगळ्या अंगाने तो अभिव्यक्त होउ लागला. इंटरनेटवर उपलब्ध असणारी सार्या साधनसामुग्रीचा वापर करत स्वतःचे साहित्य, स्वतःचे विश्व नव्याने चितारण्याचा केलेला प्रयत्न हा त्या वर्गाने स्वतःसाठी तयार केलेलं एक प्रकारंच भांडवलंच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा जोतिबा फुले हे त्यांच्या ज्ञानसंग्रहाकडे ते सोशल कॅपिटलच्या कोनातूनच पाहत असत. वर्तमान स्थितीत जर बाबासाहेब असते तर कदाचित अत्याधुनिक साधनांच्या मदतीने त्यांच्या ज्ञानाचा अधिक पटीने आपल्याला फायदा करून घेता आला असता.
लॉगीन या सदरातील अनेक लेखांमधून आपण नवनवीन संकल्पनांचा परिचय करून घेतला. सोशल नेटवर्किंगच्या जगात कशा तर्हेने क्षणाक्षणाला सगळंच अपडेट होत असतं याचाही वेळोवेळी मागोवा घेत राहीलो. जगातील महाकाय अर्थव्यवस्था मंदीच्या जाळ्यात अडकल्या, अनेक मातब्बर बँकर बुडाले, कैक उद्योगपतींचे उद्योग हॅक झाले, परंतू सायबर इंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग असेलल्या सोशल नेटवर्किंग साईट्सची उलाढाल आधीपेक्षा अधिक वेगाने फोफावत राहीली आणि ह्याच वेगाने वाढत राहील. त्याचं एकच प्रमुख कारण, इंटरनेट कमॉडिटी असलेलं सोशल नेटवर्किंगचं सोशल कॅपिटल मध्ये झालेलं रुपांतर.
‘सोशल कॅपिटल’, शब्द थोडासा अनोळखी वाटतो ना. साधारणपणे लिक्वीड कॅपिटल, ह्यूमन कॅपिटल, इंटेलेक्चुअल कॅपिटल, टेक्निकल कॅपिटल सारख्या संकल्पना आपल्याला माहित आहेत. परंतू सोशल कॅपिटला तसा नेहमीच्या वापरातला नाही. अगदी एरिस्टॉटल पासून ते जेम्स कोलमन पर्यंतच्या शेकडो विद्वानांनी सोशल कॅपिटलची व्याख्या आणि त्यासंदर्भातील हजारो थेअरीज मांडून ठेवल्या आहेत. परंतू गेल्या शतकातील ९० च्या दशकापासून, जागतिकिकरणाचा प्रसार झाल्यानंतर खर्या अर्थाने सोशल कॅपिटलच्या जडणघडणीची सुरूवात झाली. संपर्क साधनांचा झालेला विकास त्यास कारणीभूत होता. सोशल नेटवर्किंगच्या उदयाने तर सोशल कॅपिटलचं अस्तित्वच मान्य झालं. सोशल कॅपिटलचा साधासरळ अर्थ म्हणजे एखाद्या विशिष्ट ध्येयाने एकत्रित आलेल्या किंवा प्रेरित झालेल्या व्यक्तिसमुहाने उभे केलेले अथवा त्यांच्या रुपाने उभे राहीलेले भांडवल. यात पैसा हा मुख्य नसतो तर समूहभावना, विश्वास, सहकार्य, आणि सामुदिक पद्धतीने भाग भांडवल आणि मनुष्यबळ निर्माण करण्याची प्रोसेस महत्त्वाची असते. नेमकं हेच सोशल कॅपिटल उभारण्यासाठीचा प्लॅटफॉर्म सोनेसांनी उपलब्ध करून दिला.
ऑनलाईन कम्यूमिटीज ह्या शेअर्ड (कॉमन) इंटरेस्ट जोपासणार्या नेटकर्यांना एकाच ठिकाणी एकत्रित होउन विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी मिळवून देतात. आणि नेमका हाच शेअर्ड इंटरेस्ट सोशल कॅपिटलचे जाळे विणण्यासाठी मदत करत असतो. फेस-टू-फेस पद्धतीपेक्षा वर्चूअल नेटवर्क फार वेगाने उभारता येते आणि ते सोयीस्कर असल्याने फेसबुक, मायस्पेस, ट्विटर सारख्या साईट्स अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या.
जास्मीन रिव्हॉल्यूशनच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास सर्व आखाती राष्ट्रांतील उत्स्फूर्त जनआंदोलने ही सोशल मिडीयाने तयार केलेल्या सोशल कॅपिटलवरच उभी राहीली होती. आपल्या भारतात अण्णा हजारेंच्या गतवर्षीच्या आंदोलनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यात भ्रष्टाचाराविरोधातील कॉमन इंटरेस्ट शेअर करणार्यांच्या नेटकर्यांचा मोठा वाटा होता. सध्याच्या घडीला भारतातील सोशल मिडिया हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहीलेला नसून त्याचा जास्तीत जास्त वापर हा माहिती व ज्ञान संग्रहासोबत त्या माहिती व ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो आहे. जगातील सर्वात मोठ्या एनसायक्लोपीडीयाचे दालन या सोशल मिडीयाने आपणा सर्वांसाठी खुले केले. हाच माहिती संग्रह व ज्ञान संग्रहच सोशल मिडीयाचे सामाजिक भांडवल म्हणजे सोशल कॅपिटल आहे.
आजच्या घडीला भारतात सोशल मिडीया वापरकर्त्यांमध्ये माध्यमहीन वर्गाचा वरचष्मा दिसून येतो. त्यांचे शेअर्ड इंटरेस्ट जपणारे माध्यम त्यांना सोशल मिडीयाच्या रुपाने मिळताच वेगवेगळ्या अंगाने तो अभिव्यक्त होउ लागला. इंटरनेटवर उपलब्ध असणारी सार्या साधनसामुग्रीचा वापर करत स्वतःचे साहित्य, स्वतःचे विश्व नव्याने चितारण्याचा केलेला प्रयत्न हा त्या वर्गाने स्वतःसाठी तयार केलेलं एक प्रकारंच भांडवलंच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा जोतिबा फुले हे त्यांच्या ज्ञानसंग्रहाकडे ते सोशल कॅपिटलच्या कोनातूनच पाहत असत. वर्तमान स्थितीत जर बाबासाहेब असते तर कदाचित अत्याधुनिक साधनांच्या मदतीने त्यांच्या ज्ञानाचा अधिक पटीने आपल्याला फायदा करून घेता आला असता. माहिती व सूचना प्रसारण क्षेत्रांतील आमुलाग्र व वैविध्यपूर्ण बदलांमुळे मानवी जीवनात परिवर्तन घडून आले. गेल्या दशकभरापर्यंत माध्यमांतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सत्यता ही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीयाच्या मर्जीवरच दाखवली जायची.
आज हजारो वेबसाईट स्वतःचे स्वतंत्र विचारपीठ घेउन उभी आहे. जेथे माहितीची किंवा बातमीची समीक्षा करण्यास वाव आहे. त्यामुळेच माहीती प्रसारणाच्या क्षेत्रातील फसवणूकीला आळा बसला. लोकांचे विचार जुळू लागले. त्यांच्या कामाची, विचारांची, ध्येय्य आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सोशल मिडीयावरूनच अनेकांनी एकत्र येउन संघटना उभारायला देखील सुरूवात केलीये. अनेकांनी छोटे मोठे उद्योग सुरू केलेत. त्यांची जाहीरातबाजी देखील सोशल मिडीयावरूनच केली जाते, कारण त्यांचा ग्राहक देखील तेथेच असतो.
थोडक्यात सोशल मिडीयाने जन्माला घातलेल्या सोशल कॅपिटलचा वापर खेळत्या भांडवलासारखा करायचा असेल तर उच-नीचतेच्या विचारांना, ज्येष्ठ-कनिष्ठ पणाच्या वागणूकीला, सर्व प्रकारच्या भेदभावनांना मातीत गाडावे लागेल. सोशल मिडीया ह्या मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधीत्व करणार्या साखळ्या आहेत. कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही. कारण हा व्यक्तीकेंद्रित खेळ नाही. या ठिकाणी समुहाचा विचार होतो. समाजातील एका समान विचारधारेच्या वर्गाचा विचार होत असतो. येथे प्रत्येकाला स्पर्धेला तोंड द्यावे लागते. सोशल मिडीयाने उभारलेले सोशल कॅपिटल हे अमेरिकेतील खुल्या अर्थव्यवस्थेत जगणार्या अनेक तरुणांनी खुप आधीच हेरले आणि त्यादृष्टीने मार्गक्रमण केले. त्याचा परिणाम आपण फेसबुक, गुगल, ट्विटर, विंडोज च्या रुपात पाहतच आहोत. त्यांनी आपल्याला सोशल मिडीया दिला, त्यावर अनलिमिटेड, सेंसॉरलेस एक्सेस देखील दिला. परंतू त्या सोशल मिडीयाचे आपण सोशल कॅपिटल बनवून त्यांना अब्जावधींचा नफा मिळवून देत आहोत. म्हणून येणार्या काळात जो सोशल मिडीयामध्ये काही ना काही नवं घेउन येण्याचा प्रयत्न करत राहील तोच या कॅपिटलचा खरा मालक राहील.
No comments:
Post a Comment